विखे पाटलांच्या 'ऑन द स्पॉट' दणक्यानंतर जवळे कडलगच्या ‘त्या’ रस्त्याचा श्‍वास मोकळा!

संगमनेर Live
0
विखे पाटलांच्या 'ऑन द स्पॉट' दणक्यानंतर जवळे कडलगच्या ‘त्या’ रस्त्याचा श्‍वास मोकळा!

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांनी मानले आभार 

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग परिसरातील ग्रामस्थांचा गेली चार दशके प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. एका चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यूने हादरलेल्या प्रशासनाला जाग आली असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या कडक निर्देशानंतर अतिक्रमित रस्त्यावरील अडथळे दूर करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

​काही दिवसांपूर्वी जवळे कडलग येथे सहा वर्षाच्या सिद्धेश कडलग या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ही घटना केवळ बिबट्याच्या हल्ल्यामुळेच नव्हे, तर रस्ता नसल्यामुळे घडली होती. जखमी सिद्धेशला मुख्य रस्त्यापर्यत नेण्यासाठी दोन किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागले. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा जीव गेला होता.

मयत ​सिद्धेशच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांना स्वतः मोटारसायकलवरून त्या वस्तीपर्यंत जावे लागले होते. या परिस्थितीची दाहकता पाहून पालकमंत्र्यांनी महसूल आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले.

​“सार्वजनिक हितासाठी रस्ते मोकळे असणे ही प्राथमिक गरज आहे. २२ जानेवारीपर्यत सर्व अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीयोग्य करा, प्रसंगी पोलीस बळाचा वापर करा,” असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिले होते.

​आमदार अमोल खताळ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. जलसंपदा विभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात येत आहे.

यावेळी उपअभियंता योगेश जोर्वेकर, शाखा अधिकारी महेश सूर्यवंशी, कॅनाल इन्स्पेक्टर मयूर देशमुख, भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीदार योगिता मोहिते, रविंद्र देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​सिद्धेशच्या मृत्यूने मिळालेली 'वाट'

​४० वर्षापासून अडकलेला हा रस्ता मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले, तरी यासाठी एका लहानग्याला आपला जीव गमवावा लागला, याची सल सर्वाच्या मनात आहे. “सिद्धेशचा बळी गेला, पण आता या रस्त्यामुळे इतर कोणाचा जीव जाणार नाही,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त करताना पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !