गुंडगिरी-अमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी ‘सेवा समिती’ला साथ द्या!

संगमनेर Live
0
गुंडगिरी-अमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी ‘सेवा समिती’ला साथ द्या! 

◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे आवाहन 

​संगमनेर LIVE | ‘राज्यघटना आणि संत परंपरेचा मानवतावादी विचार जपणारे आपण आहोत. मंत्रीपदासाठी इकडून तिकडे उड्या मारल्या असत्या तर मीही मंत्री झालो असतो, परंतु मी तसे कधी केले नाही. चाळीस वर्षे मी तालुका जपला, शांतता आणि सुव्यवस्था राखत विकास केला. मात्र, मागील एक वर्षांमध्ये शहरात गुंडगिरी, दादागिरी वाढली असून टोल भरून अमली पदार्थ संगमनेरमध्ये येत आहेत. हे सगळे थांबवण्यासाठी संगमनेरकर म्हणून सर्वानी संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा,' असे आवाहन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

​संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोर्वे नाका, चैतन्य नगर, आणि बागवानपुरा येथे झालेल्या विविध सभांमध्ये ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, उत्कर्षा ताई रुपवते, अजिज ओहरा, विश्वासराव मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, लाला पठाण, इसाहक खान पठाण यांच्यासह सेवा समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

​बाळासाहेब थोरात म्हणाले की, ही निवडणूक शहर आणि तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या. भाजपा सत्तेसाठी काहीही करते, धर्माचा आणि पैशाचा वापर याचबरोबर विविध फंडे वापरले जातात.
​'मी ४० वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, कधीही भेदभाव केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेतले, अगदी विरोधकांनाही बरोबर घेतले. मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहरांमध्ये गुंडागिरी, काळे धंदे वाढले आहेत. ड्रग्स, नशेच्या गोळ्या मिळत आहेत. हे सर्व टोल भरून संगमनेर मध्ये येत आहे. हे सर्व ओळखा.

​आपल्या सर्वांना संगमनेर शहर जपायचे आहे, येथील संस्कृती आणि बंधू भावाचे वातावरण टिकवायचे आहे. त्यामुळे आता आपसातील मतभेद विसरून एकत्र या, पुन्हा चूक होऊ द्यायची नाही, आणि शहरात चांगले वातावरण करायचे आहे. आपण एकनिष्ठ राहिलो, विचार बदलला नाही, म्हणून संगमनेर सेवा समितीला भक्कम साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

​आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण निधी आणला आणि विकासाची कामे केली. जो निधी आपण आणला तो खुलेआम सांगतो, दुसऱ्याच्या निधीवर कधीही हक्क सांगत नाही.

​'यंग नॅशनल ग्राउंडसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवला, कामाचे भूमिपूजन केले; मात्र मला श्रेय मिळू नये म्हणून या लोकांनी स्थगिती आणली होती. पुढील आठवड्यामध्ये या कामाला सुरुवात करून अत्यंत आदर्शवत क्रीडा संकुल आपण सुरू करणार आहोत. चांगले काम करताना अजिबात घाबरायचे नाही,' असे ते म्हणाले. सेवा समिती सर्वांसाठी कायम काम करणार असून पुढील काळात आदर्शवत संगमनेर शहर बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

​माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘खोटे बोल पण रेटून बोल' ही विरोधकांची पद्धत आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांना जाब विचारा, सामाजिक कामात त्यांचे योगदान विचारा.

​बाळासाहेब थोरात यांनी मतदारांना आवाहन केले की, डॉ. मैथिली तांबे या उच्च विद्या विभूषित आहेत. सेवा समितीचे सर्व उमेदवार सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे आहेत. मात्र काही लोकांनी मत विभाजन करण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांचे मित्र तपासा आणि संगमनेर शहराच्या विकासासाठी आणि वैभवासाठी सर्वांनी एकमताने संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभे राहावे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !