देशसेवेत रुजू झालेल्या संगमनेरच्या ६१ तरुणांचा गौरव!
◻️ शेतकरी आणि जवानांचे देशासाठी मोठे योगदान - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | शेतकरी कष्ट करून अन्न पिकवतो, तर जवान ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करतो. हे दोघेही देशातील नागरिकांच्या जीवनातील आधारस्तंभ असून, ज्या युवकांना देशसेवेची ही गौरवशाली संधी मिळाली आहे, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आपल्या कुटुंबाच्या आणि तालुक्याचे नाव मोठे करावे, असे गौरवोद्गार कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक कॉग्रेस आणि एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सैन्यात निवड झालेल्या ६१ तरुणांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना, सैनिक आणि शेतकरी यांच्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, “सैनिक हा सीमेवर उभा असतो आणि त्यामुळे देशातील नागरिक सुरक्षित असतात. युवकांना विविध क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, परंतु या युवकांनी अत्यंत परिश्रम करून सैन्यामध्ये नोकरी मिळवली आहे. अत्यंत प्रामाणिकपणे काम करून आपल्या कुटुंबाचा आणि तालुक्याचा लौकिक वाढवा. निवड झालेल्या सर्व युवकांचा तालुक्याला आणि आम्हा सर्वाना सार्थ अभिमान आहे."
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी युवकांना नोकरीसाठी केलेल्या खडतर परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, “नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे. मात्र, या युवकांनी खडतर परिश्रम करून यश मिळवले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी युवकांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने काम केले आहे.”
याचबरोबर डॉ. थोरात यांनी एक गंभीर इशाराही दिला. त्या म्हणाल्या, “तालुक्यामध्ये अवैध धंदे आणि अमली पदार्थांची तस्करी वाढली असून, यामुळे अनेक युवक व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका आहे. निवड झालेल्या युवकांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले, ही कौतुकास्पद बाब आहे. संगमनेर तालुका आपला परिवार असून, आपल्या कुटुंबातील विद्यार्थी सीमेवर जात आहेत, याचा अमृत उद्योग समूहाला अभिमान आहे.”
यावेळी तालुक्यातील सैन्यात व पोलीस दलात निवड झालेल्या ६१ युवकांचा व त्यांच्या पालकांचा शाल, बुके आणि पर्यावरणाचा संदेश देणारे झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या विविध युवकांनी यावेळी आपले मनोगते व्यक्त केली.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केले.