संगमनेरमध्ये ड्रग्स आणि गांजा तस्करीत ‘राजकीय कनेक्शन?’
◻️ आमदार खताळ यांचे विधानसभेत अम्लीय पदार्थ तस्करीवर खळबळजनक आरोप
संगमनेर LIVE (नागपूर) | संगमनेर तालुक्यात गांजा व 'एमडी' (मेफेड्रोन) सारख्या अत्यंत घातक अमली पदार्थाच्या तस्करीने आता गंभीर स्वरूप धारण केले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपीचे थेट एका माजी लोकप्रतिनिधी सोबतचे फोटो असल्याचा खळबळजनक दावा आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात करत राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली.
ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन गृहराज्य मंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सभागृहात दिले, मात्र आमदार खताळ यांनी कठोर कारवाईसाठी अनेक थेट आणि महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
आमदार खताळ यांचे थेट सवाल: फास्ट ट्रॅक कोर्ट ते 'मकोका'ची मागणी
संगमनेरमध्ये एमडी (मेफेड्रोन) या सिंथेटिक ड्रग्सचा समावेश झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एमडी ड्रग्जमुळे सेवन करणारी व्यक्ती अल्पकालावधीत मृत्यूच्या दारात पोहोचू शकते, हे निदर्शनास आणून देत आमदार खताळ यांनी या ड्रग्स माफियांवर अत्यंत कठोर कारवाईची मागणी केली.
खताळ यांनी उपस्थित केलेले प्रश्न
१) गांजा व अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवणार का?
२) अमली पदार्थ विरोधी एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम २७ अ अंतर्गत पोलिसांना अधिक अधिकार देणार का?
३) या ड्रग्ज माफियांवर 'मकोका' (MCOCA) व 'पीएमएलए' (PMLA) अंतर्गत कठोर कारवाई करणार का?
४) जिल्हास्तरावर 'ड्रग्स विरोधी टास्क फोर्स' (Drugs Anti-Task Force) तातडीने स्थापन करणार का?
५) नार्कोटिक्स तस्करीतून होणारी आर्थिक उलाढाल (मनी लॉन्डरिंग) रोखण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एमडी ड्रग्जवर अधिक कडक निर्बध घालण्याची विनंती करणार का?
माजी लोकप्रतिनिधींच्या कनेक्शनवर गंभीर आरोप
आमदार खताळ यांनी दोन मोठ्या जप्ती प्रकरणांचा उल्लेख करत थेट माजी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले संगमनेर शहराजवळील सुकेवाडी गावात सव्वा कोटी रुपयांचा ४५६ किलो गांजा जप्त करण्यात आला. हा गांजातस्कर कोणत्या माजी आमदारांच्या सोबत फिरत होता, याची चौकशी होणार का?
पुणे - नाशिक महामार्गावरील गणेशनगर परिसरातून ४३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. माजी लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानाशेजारील सलूनमध्ये एमडी ड्रग्जची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपींना पाठीशी घालणारे राजकीय नेते कोण आहेत, याची चौकशी केली जाणार का? असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत.
गृहराज्यमंत्र्यांचे सभागृहात आश्वासन
आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना गृहराज्य मंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सांगितले की, “गांजा तस्करी करणाऱ्याला सरकार पाठीशी घालणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल.”
ड्रग्ज स्रोतांच्या शोधासाठी विशेष मोहीम हवी
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या, इंजेक्शन सिरिंज, अवैध औषधे, मेफेंटरमाईन सल्फेटसारख्या पदार्थाची तस्करी करणारे सप्लायर व विक्रेते यांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापर्यत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्जचे स्रोत शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी ठाम मागणीही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी केली.