“निव्वळ आश्वासने नव्हे, ठोस कामातूनच जनतेच्या विश्वासाची परतफेड करू”
◻️ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची राहुरीकरांना ग्वाही
संगमनेर LIVE (राहुरी) | राजकारणात भाषणबाजी कमी करून प्रत्यक्ष कामावर अधिक भर दिला पाहिजे. जनतेने टाकलेला विश्वास केवळ आश्वासनांनी नव्हे, तर ठोस कामांच्या माध्यमातून परत फेडला पाहिजे. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही आणि यापुढेही देणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी येथे केले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधन वाटप तसेच विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.
ते म्हणाले की, स्वर्गीय कर्डिले साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य, शेतकरी आणि राहुरी तालुक्याच्या विकासासाठी समर्पित केले. जनतेचे प्रश्न सोडवणे हेच त्यांचे खरे राजकारण होते. त्यांच्या संकल्पनेतूनच या योजनेची सुरुवात ब्राम्हणी गावातून झाली आणि आज ती प्रत्यक्षात उतरलेली पाहणे हे अत्यंत समाधानाचे आहे.
डॉ. विखे पाटील यांनी या वेळी आपले कार्य अविरत सुरू राहील, हे स्पष्ट केले. “मी आज खासदार नसलो तरी माझे काम थांबलेले नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर कारखाना उभा केल्याची माहिती दिली, ज्यात या एका महिन्यात दीड लाख टनांहून अधिक उसाचे गाळप केले जात आहे.
माजी खासदार असलो तरी शेतकऱ्यांचा ऊस नेण्याचे आणि ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य पुरवण्याचे काम मी सातत्याने करत राहणार आहे. राजकारणात कोणताही स्वार्थ न ठेवता काम केल्याचा पुनरुच्चार करताना त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री सर्व पदे ही जनतेची सेवा करण्यासाठीच असतात.
युवा नेते अक्षय कर्डिले यांनी या वेळी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, हा कार्यक्रम आनंदाचा असला तरी कर्डिले साहेब आपल्या सोबत नसल्याची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते आहे.
“हा उपक्रम त्यांच्या संकल्पनेतूनच नियोजित झाला होता. जनतेवर, विशेषत: ब्राम्हणी गावावर त्यांचे अपार प्रेम होते. आजपर्यंत साहेबांकडे ठेवलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आम्हा सर्वावर आहे," असे अक्षय कर्डिले म्हणाले. कर्डिले साहेबांचे आशीर्वाद आणि डॉ. सुजय विखे पाटील तसेच नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन हीच आमची खरी ताकद आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने तालुका व जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करत राहू. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम करत राहण्याचा शब्द मी आज देतो, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.