शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे बाबा आढाव हरपले
◻️ चळवळीच्या पातळीवर मोठी हानी - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे, असे उद्गार कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले. “कालच त्यांना भेटण्यासाठी मी रुग्णालयात गेलो होतो. त्यांच्या जाण्याने चळवळीच्या पातळीवर मोठी हानी झाली आहे,” अशा शब्दांत थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
थोरात म्हणाले की, पुण्यातील माझ्या शैक्षणिक कालखंडामध्ये हमाल पंचायतमध्ये झालेल्या काही बैठकांना मी उपस्थित होतो. त्या बैठका माझ्यासाठी अमूल्य आठवणी ठरल्या आहेत. बाबा आढाव यांनी लोकशाहीचे रक्षण, श्रमिक आणि कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला.
बाबा आढाव यांनी आयुष्यभर ‘एक गाव - एक पाणवठा’सारख्या त्यांच्या चळवळी सामाजिक समतेचा ठाम आग्रह धरणाऱ्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, आणीबाणीविरोधी संघर्ष, महागाई विरोधातील आंदोलन आणि नामांतराचा लढा यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. वयाच्या ९३ व्या वर्षीही ईव्हीएमविरोधात आंदोलन करणारे बाबा आढाव हे संघर्षाचे जिवंत प्रतीक होते. या सर्व संघर्षांमध्ये त्यांना अनेकदा तुरुंगवास सहन करावा लागला होता.
कष्टकरी वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी केवळ आंदोलनेच केली नाहीत, तर ठोस रचनात्मक कार्यही केले. त्यांनी कष्टकऱ्यांसाठी विविध संस्था उभ्या केल्या, पतपेढ्या स्थापन करून त्या यशस्वीपणे टिकवून ठेवल्या. श्रमिकांचे प्रश्न शासनदरबारी पोहोचवून त्यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले, असे थोरात यांनी नमूद केले.
“शेवटच्या श्वासापर्यत त्यांचा लढवय्या स्वभाव आणि समाजवादी विचार कायम राहिला. त्यांनी दिलेला विचार आणि मूल्ये पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल," असे बाळासाहेब थोरात यांनी शेवटी सांगितले.