मुंबईत आरपीआयकडून ‘स्वबळाची’ तयारी?

संगमनेर Live
0
मुंबईत आरपीआयकडून ‘स्वबळाची’ तयारी?

◻️ “रिपब्लिकन कार्यकर्त्याचा अवमान आता सहन करणार नाही” आठवलेंचा भाजपला शेवटचा अल्टीमेटम!

◻️ मुंबईत ‘कमळ’ फुलवण्यासाठी साथ दिली, त्याच हाताला भाजपने रिकामे ठेवले


संगमनेर LIVE (​मुंबई) | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. भाजपकडून रिपब्लिकन पक्षाची (आठवले) सातत्याने होत असलेली उपेक्षा आणि अवमान आता सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महायुतीने सन्मानजनक जागा न दिल्यास मुंबईत रिपब्लिकन पक्ष ३८ पेक्षा जास्त जागांवर ‘मैत्रीपूर्ण’ लढत देणार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले.

​वांद्रे येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

​नामदार रामदास आठवले यांनी भाजपवर थेट निशाणा साधताना सांगितले की, रिपब्लिकन पक्षाने १० दिवसांपूर्वीच २६ जागांची यादी देऊनही भाजपने चर्चेसाठी साधी दाद दिली नाही, उलट शेवटच्या क्षणापर्यंत केवळ ‘झुलवत’ ठेवून पक्षाची फसवणूक केली आहे. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकांमध्ये सन्मानजनक जागा मिळूनही यंदा मात्र एकही जागा न सोडणे हा मित्रपक्षाचा घोर अपमान असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी देऊ केलेल्या ६-७ जागा आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशहिताच्या कार्यामुळे आम्ही जरी एनडीए सोबत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी संघर्ष अटळ आहे. भाजपने अजूनही फेरविचार करून किमान १० ते १२ जागांवर आपल्या उमेदवारांची माघार घ्यावी, अन्यथा मुंबईत ३८ पेक्षा जास्त जागांवर महायुतीशी ‘मैत्रीपूर्ण’ लढत देण्यास रिपब्लिकन पक्ष पूर्णपणे सज्ज आहे, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

​मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, धुळे आणि मीरा-भायंदरमध्येही रिपब्लिकन पक्षाला एकही जागा न सोडणे, हा पक्षाचा घोर अपमान असल्याचे आठवले यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील पेच अधिक वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

“आम्ही भाजपचे सर्वात जुने आणि विश्वासू मित्र आहोत. आमच्यामुळेच महायुतीला मोठी ताकद मिळाली आहे. मात्र, ताकद असूनही जर आम्हाला डावलले जात असेल, तर रिपब्लिकन पक्ष मुंबईत ३८ पेक्षा जास्त जागांवर स्वतंत्रपणे रिंगणात उतरेल.” असा अल्टीमेटम नामदार रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !