नगर - मनमाड रस्ता करता न येणाऱ्यांनी आम्हाला हिशोब विचारू नये - बाळासाहेब थोरात
◻️ पिंपरणे येथे ‘शेतकरी मेळावा’ अभूतपूर्व उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE | गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम आम्ही केले आहे. नैतिकता हा आमच्या राजकारणाचा पाया आहे. मात्र, गेल्या एका वर्षात तालुक्यात अमली पदार्थाची तस्करी, गुंडगिरी आणि दहशत वाढली असून, बेकायदेशीर टोल वसुली सुरू झाली आहे. ही प्रवृत्ती रोखून तालुका वाचवण्यासाठी जनतेने आता पुन्हा एकदा यलगार पुकारला आहे, असा इशारा कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला. यावेळी त्यांनी नाव न घेता पालकमंत्र्यांवर कडाडून टीका करताना नगर - मनमाड रस्ता करता न येणाऱ्यांनी आम्हाला हिशोब विचारू नये असा घणाघात केला.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगरपालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात थोरात बोलत होते.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणातून तालुक्याच्या ४० वर्षाच्या विकासाचा लेखाजोखा मांडताना निळवंडे धरण, कालवे, समृद्ध सहकार आणि सर्वकष पायाभूत सुविधांच्या माध्यमातून संगमनेरला प्रगतशील बनवल्याचे आवर्जून सांगितले. मात्र, गेल्या वर्षभरात तालुक्याचे चित्र बदलले असून गुंडगिरी, तस्करी आणि बेकायदेशीर हप्तेखोरी यांसारख्या समाजकंटक प्रवृत्तींनी डोके वर काढल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
केवळ विकासावरच नव्हे, तर रेल्वे मार्गाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची दिशा बदलून अकोले आणि संगमनेर या दोन तालुक्यांमध्ये जाणीवपूर्वक वाद लावण्याचे काम सध्या सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीत कार्यकर्त्यानी आपले वैयक्तिक गट-तट बाजूला सारून एकजुटीने उभे राहणे काळाची गरज असून, अन्यथा भविष्यात गुलामगिरी स्वीकारावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आम्ही संगमनेरचा लौकिक राज्याच्या नकाशावर नेला. ऑनलाईन सातबारा आणि शिक्षणाचा मूलभूत अधिकार ही आमच्या काळातील कामे आहेत. ज्यांना साधा नगर-मनमाड रस्ता नीट करता आला नाही, ते आम्हाला विचारतात की ४० वर्षात काय केले? हा प्रश्न विचारणाऱ्यांची पात्रता काय? असा टोला लावताना निळवंडे धरण आणि कालव्यासाठी योगदान नसलेले ‘जलदूत’ म्हणून घेत असल्याची तोफ डागली.
तर, विरोधकांच्या शिक्षण संस्था देखील मंजूर करताना दुजा भाव कधी केला नसल्याचे सांगताना पिंपरणे सह उंबरी बाळापूर, वरवंडी आणि शिबलापूर येथील विरोधकांचे प्रवरेचे हायस्कूल मंजूर केल्याचे सांगितले.
शरद थोरात म्हणाले “तुमच्याकडे आलेली सत्ता ही कर्तृत्वाने आलेली नसून आम्ही गाफील राहिल्याने आली आहे. दुसऱ्याच्या इशाऱ्यावर तालुका चालू देणार नाही. नाद कुणाचाही करा, पण संगमनेर तालुक्याचा नाद करू नका.” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
रणजीतसिंह देशमुख यांनी संगमनेरचा स्वाभिमान जपण्यासाठी सर्वानी कटिबद्ध राहण्याचे सांगितले. डॉ. जयश्रीताई थोरात यांनी कार्यकर्त्याना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. सुधाकर रोहम यांनी विरोधकांनी टिका करताना आपली पात्रता तपासावी असे म्हणत विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला.
याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, पांडुरंग घुले, लहानू गुंजाळ, शंकर खेमनर, गणपत सांगळे, अण्णासाहेब राहिंज, डॉ. जयश्री थोरात, अमर कतारी, शिवाजी जगताप, लहानू वर्पे, अजय फटांगरे, बाबा ओहोळ, के. के. थोरात, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, विश्वासराव मुर्तडक, बुवाजी पुणेकर, राजेंद्र चकोर, योगेश खेमनर, आराध्या राहिंज, रामेश्वर पानसरे यांच्यासह संगमनेर नगरपालिकेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि कॉग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मीनानाथ जोर्वेकर यांनी केले, सुत्रसंचालन नामदेव कहांडळ तर, आभार तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी मानले.
शरद थोरात यांची उमेदवारी जाहीर
बाळासाहेब थोरात यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा पिंपरणे येथील शेतकरी मेळाव्यातून शंखनाद केला. याप्रसंगी त्यांनी कॉग्रेस पक्षाकडून शरद थोरात यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि कार्यकर्त्याना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.