शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली धमकी आणि दहशतीचे राजकारण - रामभाऊ राहाणे

संगमनेर Live
0
शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली धमकी आणि दहशतीचे राजकारण - रामभाऊ राहाणे 

◻️‘कालच्या पोरामुळे’चं विरोधकांवर दारोदार फिरण्याची वेळ

​संगमनेर LIVE | ​चाळीस वर्षाची सत्ता हातातून गेल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने अद्दल घडवल्यानंतरही कॉग्रेसचे नेते अजूनही सुधरायला तयार नाहीत. शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली राजकीय स्टंटबाजी करून महायुतीच्या कार्यकर्त्याना आणि आमदारांना धमकावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा सडेतोड इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे यांनी दिला आहे. 

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित कॉग्रेसच्या सभेत शरद थोरात यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना राहाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली आक्रमक भूमिका मांडली.

​यावेळी रामभाऊ राहाणे यांनी विरोधकांवर तोफ डागताना म्हटले की, “आमच्या नादी लागाल तर तालुक्यात फिरणे मुश्किल होईल” अशा धमक्या देणाऱ्यांनी लोकशाहीचा अवमान केला असून सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्या माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत ही गुंडगिरीची भाषा वापरली जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. 

ज्यांना विरोधक ‘कालचे पोरगे’ म्हणून हिणवत आहेत, त्याच आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांना जनतेच्या दारापर्यत फिरण्यास भाग पाडले आहे. खताळांच्या कामाच्या धसक्यामुळेच आज कारखान्याच्या सभासदांना त्यांच्या हक्काची साखर वाटप करावी लागत आहे. 

आयुष्यभर ठेकेदारी करणाऱ्या शरद थोरात यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वेळोवेळी भूमिका बदलल्या असून, स्वतःच्या बहिणीविरुद्ध निवडणूक लढवून कुटुंबाला अडचणीत आणणाऱ्यांना आता ठेकेदारी धोक्यात आल्यावर पुन्हा घराण्याची आठवण झाली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पिंपरणे येथील कथित शेतकरी मेळावा म्हणजे केवळ एक राजकीय नाटक असून, तिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न बोलता फक्त महायुतीला लक्ष्य करण्यात आले. 

पैसे खर्च करून आणि जेवणाचे आमिष दाखवून जमवलेली ही गर्दी म्हणजे विरोधकांच्या नैराश्याचे प्रतीक आहे. याउलट, आमदार खताळांच्या माध्यमातून तालुक्यात पहिल्यांदाच शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचत असून मोठ्या प्रमाणावर आलेला निधी आणि मार्गी लागणारी कामे यामुळेच विरोधकांची पोटदुखी वाढली आहे.

​रामभाऊ राहाणे म्हणाले, “लोकशाहीत अशा प्रकारच्या दडपशाहीला आणि दहशतीला स्थान नाही. स्वाभिमानी संगमनेरकर या धमक्यांना कधीही भीक घालणार नाहीत. विरोधकांच्या या दहशतवादाला महायुतीच्या माध्यमातून योग्य वेळी आणि योग्य भाषेत जशास तसे उत्तर दिले जाईल." असा इशारा देखील दिला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !