माजी लोकप्रतिनिधींना अचानक पिंपरणेसह परिसरातील गावांची आठवण? - गोकुळ दिघे
◻️ जोर्वे गटात खताळ-विखे पाटलांकडून ‘विकासाची लाट’ आल्यामुळे विरोधक अस्वस्थ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील जोर्वे गटात गेल्या ४० वर्षापासून सत्तेत असूनही लोकहिताचे एकही ठोस काम न करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधीना आता अचानक पिंपरणे आणि परिसरातील गावांचा पुळका कसा काय आला? असा सवाल भाजपचे मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी उपस्थित केला आहे. तसेच माजी आमदारांनी ’शेतकरी मेळावा’ या नावाखाली चालवलेला लोकसंवादाच्या प्रयत्नावर देखील त्यांनी टीका केली.
गोकुळ दिघे यांनी माजी लोकप्रतिनिधी आणि जुन्या जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अनेक गंभीर आरोप केले. गेल्या सात वर्षाच्या प्रदीर्घ काळात या लोकप्रतिनिधींनी जोर्वे गटातील एका तरी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
४० वर्षे मंत्रिपद उपभोगूनही डिग्रस, कोळवाडे आणि अंभोरे यांसारख्या गावांत साधे चालण्यायोग्य रस्ते निर्माण करता आले नाहीत, विशेष म्हणजे, या गावांच्या शेजारीच धरणे असूनही ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी माजी आमदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला.
गोकुळ दिघे यांनी जाधव वस्ती (ठाकरवाडी) येथील विदारक परिस्थितीवर प्रकाश टाकताना म्हटले की, आजही या वस्तीवरील अनेक महिलांना आधार कार्डासारख्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. सुमारे ५०० लोकसंख्या असूनही तिथे साधी अंगणवाडी उपलब्ध नाही, ही बाब इतकी वर्षे सत्तेत राहिलेल्या नेत्यांसाठी भूषणावह नसल्याचे त्यांनी नमूद केले.
याउलट, राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर आमदार अमोल खताळ आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे जोर्वे गटात खऱ्या अर्थाने विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. केवळ पिंपरणे गावातच १० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची बोचरी टीका केली.
कॉग्रेस कार्यकर्त्यानी आयोजित केलेला ’शेतकरी मेळावा’ हा केवळ दिखावा असल्याची टीका करताना दिघे म्हणाले की, संगमनेरमधून आता ‘पंजा’ पूर्णपणे गायब झाला आहे. धनशक्तीच्या जोरावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा ग्रामीण भागात सत्कार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, प्रलंबित प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुती आणि अमोल खताळ यांच्यावर विश्वास टाकून जुन्या लोकप्रतिनिधीला नाकारले आहे.
तर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आल्यापासून ग्रामीण जनतेच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या असून विरोधकांनी विकासात खोडा घालणे थांबवावे, असे आवाहन देखील गोकुळ दिघे यांनी केले.