बाळासाहेब थोरातांच्या संकल्पनेतून साकारले महाराष्ट्रातील पहिले ‘ट्युलीप गार्डन’
◻️ संगमनेर कृषी महाविद्यालयाच्या जिद्द आणि तंत्रज्ञानाचा विजय
◻️ काश्मीरनतंर महाराष्ट्राच्या मातीत प्रथमच बहरला ‘हॉलंड’चा ट्युलीप
संगमनेर LIVE | नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या संगमनेरच्या शिरपेचात एक अतिशय मानाचा आणि जागतिक दर्जाचा तुरा रोवला गेला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कल्पकतेतून आणि अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रातील पहिल्या ‘ट्युलीप गार्डन'चे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. काश्मीरच्या शीतल खोऱ्यात डोलणारे हे ट्युलीप आता संगमनेरच्या मातीत दिमाखात बहरल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या अभिनव प्रयोगाकडे वेधले गेले आहे.
ट्युलीप ही फुले प्रामुख्याने अत्यंत थंड हवामानातच फुलतात, त्यामुळे काश्मीरमधील ट्युलीप गार्डन हे आजवर देशातील प्रमुख उदाहरण मानले जात होते. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या तुलनेने उष्ण हवामानाच्या भागात असा प्रयोग करणे हे कृषी शास्त्रज्ञांसमोर एक मोठे आव्हान होते.
हे आव्हान पेलण्यासाठी थेट हॉलंड (नेदरलँड्स) येथून उच्च प्रतीचे कंद आयात करण्यात आले. तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मातीचा पोत, योग्य तापमान नियंत्रण, सूक्ष्म पाणी व्यवस्थापन आणि खतांचे काटेकोर नियोजन करण्यात आले. या शास्त्रोक्त मेहनतीमुळेच आज गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या, लाल, जांभळ्या आणि नारंगी अशा आठ वेगवेगळ्या जातींच्या ट्युलीप्सनी हा परिसर उजळून निघाला आहे.
या उद्यानामुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळाली नाही, तर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या फुलशेतीचा प्रत्यक्ष अनुभव आणि संशोधनाची संधी प्राप्त झाली आहे. “कृषी महाविद्यालय हे केवळ पदव्या देणारे केंद्र न राहता ते नवनवीन संशोधनाचे केंद्र बनले पाहिजे,” ही बाळासाहेब थोरात यांची भूमिका या प्रयोगातून सिद्ध झाली आहे.
या गार्डनमध्ये प्रवेश करताच मिळणारा आल्हाददायक सुगंध आणि रंगीबेरंगी फुलांची नजरवेधक रांग पर्यटकांना आपण काश्मीरमध्येच आहोत की काय, असा भास निर्माण करून देते. कृषी, शिक्षण आणि पर्यटनाचा हा सुंदर संगम महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.
दरम्यान “संगमनेरचे हे ट्युलीप गार्डन म्हणजे आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि जिद्दीचा एक अद्भुत आविष्कार आहे!” अशी प्रतिक्रिया नागरीकानमधून येत आहेत.