विकासाचा ‘बॅकलॉग' भरून काढणाऱ्या ८४९ कोटींच्या निधीमुळे विरोधकांचा जळफळाट!
◻️भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांच्याकडून विरोधकांचा समाचार
◻️आमदार खताळ यांच्या विकासकामांमुळे विरोधकांच्या पोटात गोळा आल्याची केली बोचरी टिका
संगमनेर LIVE | महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकासनिधी आणून ४० वर्षापासून रखडलेली विकास कामे आमदार अमोल खताळ मार्गी लावत आहेत. गेल्या वर्षभरातच संगमनेर तालुक्याला मिळालेल्या तब्बल ८४९ कोटी रुपयांच्या भरघोस निधीमुळे माजी लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्याचा जळफळाट होत असून, त्यातूनच ते या निधीवर टीका करत असल्याची बोचरी टीका भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी केली आहे.
आमदार खताळ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर विधानसभा मतदारसंघातील १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांवरील तळागाळातील नागरिकांपर्यंत महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवला जात आहे. आमदार खताळ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील ४० वर्षाचा विकासकामांचा बॅकलॉग आता वेगाने भरून निघत असून, प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या मूलभूत समस्या सुटत आहेत.
रस्त्यांच्या समस्यांबाबत भाष्य करताना भोसले म्हणाले की, “गावागावातील रस्त्यांच्या दुरावस्थेची जाणीव शेतकरी आणि सामान्य नागरिकांना आहे. शेत पाणंद रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भिजत घोंगडे नेमके कुणामुळे राहिले, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. राजकीय स्वार्थापोटी आजवर शेतकऱ्यांना पाण्यासाठी झुलवत ठेवण्याचे पाप संगमनेरच्या माजी लोकप्रतिनिधींनी केले आहे. यापूर्वी मंत्रीपदे भोगणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या ठेकेदार समर्थकांना शेतकऱ्यांच्या दुःखाची कधीच जाणीव झाली नाही.” अशी तोफ भोसले यांनी डागली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यादृष्टीने भोजापूर पूर चारीचे काम मार्गी लागून पाणी तिगाव माथापर्यत पोहोचले आहे. तसेच निळवंडेच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी जलसंपदा विभागाने मोठा निधी मंजूर केला आहे. एकेकाळी पाण्यावाचून दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकूर पठार भागातील ६ उपसा सिंचन योजनांचे एकत्रिकरण आणि को.प. बंधारे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामाचे सर्वेक्षण आता सुरू झाले आहे.
विकासाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे एमआयडीसीची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने हे यश मिळत असताना, विरोधकांनी मात्र ‘आम्ही पाठपुरावा केला’ असा दावा करणे हास्यास्पद असल्याची बोचरी टिका करताना मागील काळात विकासकामे अपूर्ण ठेवून जनतेला जो त्रास दिला, त्याचे आत्मचिंतन आणि प्रायश्चित्त करण्याची गरज आता विरोधकांना असल्याचा सल्ला देखील भाजपचे गुलाब भोसले यांनी दिला आहे.