अजितदादावर अंत्यसंस्कार; ‘कामांचा माणूस’ अनंतात विलीन

संगमनेर Live
0
अजितदादावर अंत्यसंस्कार; ‘कामांचा माणूस’ अनंतात विलीन

◻️​ दिग्गजांची उपस्थिती, लाखो डोळ्यांतून अश्रूंचा पूर


संगमनेर LIVE (​पुणे) | ​महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धडाडीचे, रोखठोक आणि कार्यक्षम नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित अनंतराव पवार (वय ६६) यांचे बुधवारी (दि. २८ जानेवारी) एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ‘जीवात जीव असेपर्यंत लोकांसाठी काम करत राहीन,’ असे म्हणणाऱ्या या लोकनेत्याच्या अकाली जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असून, पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेहमीप्रमाणे आपल्या कामाचा धडाका सुरु ठेवत, बारामतीकडे येत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. बुधवारी सकाळी बारामतीजवळ त्यांच्या खाजगी विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यातच या झुंजार नेत्याची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६६ व्या वर्षी, अजूनही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत असतानाच त्यांची झालेली ही ‘अकाली एक्झिट’ मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली.

​लाखो जनसमुदायाचा आक्रोश: 'परत या दादा...'

आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला होता. बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी आपल्या ‘दादां’ना शेवटचे पाहण्यासाठी आलेल्या लाखो कार्यकर्त्याचे आणि सामान्य नागरिकांचे डोळे पाणावलेले होते. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह पुन्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

​शासकीय इतमामात अखेरचा निरोप..

आज गुरुवारी (दि. २९ जानेवारी) सकाळी ११ च्या सुमारास बारामतीत अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘अजित दादा अमर रहे'च्या घोषणांनी आणि आक्रोशाने आसमंत भरून गेला होता. पुन्हा एकदा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांचे पार्थिव आणण्यात आले, जिथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

​यावेळी राज्य शासनाच्या वतीने त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना देण्यात आली. बिगुलच्या करुण स्वरांनी उपस्थितांची मने हेलावून गेली.

पवार कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगी सांत्वन करण्यासाठी आणि अजितदादांना आदरांजली वाहण्यासाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते बारामतीत उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार शाहू महाराज छत्रपती, मनसे प्रमुख राज ठाकरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, आंध्रप्रदेशचे मंत्री नीरज चंद्रशेखर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, जयंतराव पाटील, महादेव जानकर, अभिनेता रितेश देशमुख, राजेंद्र गवई, यांच्यासह सर्व पक्षीय मंत्री, खासदार आणि आमदारांनी अजित पवारांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

अंत्यविधीच्या वेळी वातावरण अत्यंत गंभीर झाले होते. अजित पवार यांना मुले जय आणि पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित लाखो कार्यकर्त्यांनी एकच हंबरडा फोडला. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतलेला, पहाटेपासून कामाला जुंपणारा आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला हा ‘दादा’ माणूस आता पंचतत्वात विलीन झाला आहे, यावर विश्वास ठेवणे अनेकांसाठी कठीण जात होते.

दरम्यान ​सह्याद्रीच्या कुशीतील हा ढाण्या वाघ आज शांत झाला असला, तरी त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्राच्या इतिहासातून कधीही पुसला जाणार नाही.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !