संगमनेरला गुटखा, ड्रग्ज, वाळू अन् कत्तलखान्यांच्या विळख्यातून मुक्त करा!
◻️ जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांकडे आमदार खताळ यांची मागणी
संगमनेर LIVE | जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री, एमडी ड्रग्ज, बेकायदेशीर कत्तलखाने तसेच वाळू उपसा यावर अधिक कठोर व प्रभावी कारवाई करण्याची ठाम मागणी आमदार अमोल खताळ यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
संगमनेर तालुक्यात गेल्या वर्षभरात विविध बेकायदेशीर बाबींवर कारवाई सुरू असली, तरी या गुन्हेगारी प्रवृत्तींवर पूर्णतः आळा घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिक ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ आणि परिणामकारक कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली तरच गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसेल, असे नमूद करत आमदार खताळ यांनी अवैध धंदे चालविणाऱ्यांसह त्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठबळ देणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज असल्याचे सांगितले. अशा गुन्हेगारीमुळे शासनाची, स्थानिक लोकप्रतिनिधींची तसेच संगमनेर तालुक्याची बदनामी होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यासंदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यापुढे तपासाची गती अधिक वाढविण्यात येणार असून, गरज भासल्यास संबंधितांवर MPDA तसेच मोक्का कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२६–२७ साठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ७५६ कोटी ४३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुमारे ८०१.३७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
तसेच चालू आर्थिक वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत १०० टक्के निधी खर्च करून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकासकामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासकीय विभागांनी विकास आराखडे तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय राखावा, अशा सूचनाही प्रशासनाला यावेळी देण्यात आल्या.