“अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व संपले”

संगमनेर Live
0
“अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व संपले”

◻️ आमदार अमोल खताळ यांनी वाहिली जड अंतःकरणाने श्रद्धांजली


​संगमनेर LIVE | “माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला घडवणारे मार्गदर्शक नेते अजितदादा पवार आपल्यात नाहीत, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून संपूर्ण महाराष्ट्र आज पोरका झाला आहे,” अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

​बारामती येथील विमान लॅडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी संपूर्ण राज्यासाठी धक्कादायक आणि वेदनादायी ठरली आहे. हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक ‘काळा दिवस’ म्हणून नोंदला जाईल, असे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले. प्रशासनावर जबरदस्त वचक असलेला आणि जनतेच्या प्रश्नांसाठी २४ तास उपलब्ध राहणारा एक लोकनेता हरपल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

​आमदार खताळ यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “मी जेव्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसमध्ये कार्यरत होतो, तेव्हापासून दादांशी माझा अत्यंत जवळचा संपर्क आला. त्यांचा ‘जनता दरबार’ मी प्रत्यक्ष अनुभवला असून, लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची तळमळ अद्वितीय होती.

प्रशासनावर त्यांची असलेली जबरदस्त पकड आणि कार्यकर्त्याकडून काम करून घेण्याची त्यांची शिस्तबद्ध पद्धत हा आम्हा सर्वासाठी अभ्यासाचा विषय होता. ‘चांदा ते बांदा’ कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करून अनेकांना नेतृत्व देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.”

​संगमनेर तालुक्याचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा आमदार म्हणून निवडून आला, तेव्हा अजितदादांना त्याबद्दल मनापासून आनंद झाला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यांनी नेहमीच मोलाचे मार्गदर्शन केल्याचे खताळ यांनी आवर्जून नमूद केले.

अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व संपले असून, एका कणखर आणि शिस्तप्रिय मार्गदर्शक नेत्याला आपण मुकलो आहोत, अशा भावना व्यक्त करत आमदार खताळ यांनी जड अंतःकरणाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !