प्रशासनावरील पकड असलेला ‘उमदा’ नेता हरपला!
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला शोक
संगमनेर LIVE | स्पष्टवक्तेपणा, कामाचा प्रचंड आवड आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुन्न करणारी आहे. या घटनेने राज्याने एक खंबीर आणि दूरदृष्टी असलेला उमदा नेता गमावला असल्याची भावना कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंवेदनेत बाळासाहेब थोरात म्हणाले की, “राजकीय कारकीर्द ऐन भरात असताना काळाने असा घाला घालणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. अजितदादा आणि आम्ही अनेक वर्षे मंत्रिमंडळात एकत्र काम केले असून त्यांच्या कामाची पद्धत आणि निर्णय घेण्याची क्षमता वाखाणण्याजोगी होती.”
अजित दादांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना थोरात यांनी पुढे नमूद केले की, प्रशासनावर त्यांची असलेली हुकूमत आणि काम करून घेण्याचे कसब हे वाखाणण्याजोगे होते. मनात जे आहे ते स्पष्टपणे मांडण्याची त्यांची शैली आणि राज्याच्या हितासाठी धाडसी तसेच कठोर निर्णय घेताना ते कधीही डगमगले नाहीत. विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळतानाच त्यांच्या प्रभावी वकृत्व शैलीमुळे ते जनसामान्यात कमालीचे लोकप्रिय होते.
दरम्यान त्यांच्या या अकाली जाण्याने केवळ राजकीयच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. असे देखील बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे.