संगमनेरमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांचे आता खैर नाही

संगमनेर Live
0
संगमनेरमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांचे आता खैर नाही

◻️ आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश 


​संगमनेर LIVE | मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त शहरात होणारी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर रोखण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “नागरिकांच्या जिवाशी खेळू नका, नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला दिले आहेत.

​मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा वापर केला जातो. मात्र, हा मांजा पक्षी, प्राणी आणि मानवांसाठी अत्यंत घातक ठरत आहे. शहरात यापूर्वी अशा मांजामुळे अनेक नागरिक आणि लहान मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार खताळ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीने कडक पावले उचलण्याच्या सूचना केल्या.

​आमदार अमोल खताळ यांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला सूचना देताना सांगितले की, शहरातील आणि विशेषतः उपनगरातील संशयास्पद दुकानांची तातडीने झडती घेऊन नायलॉन मांजाचा साठा जप्त करावा. केवळ आर्थिक दंड आकारून न थांबता, लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले. उपनगरांमध्ये लपून-छपून होणाऱ्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत आणि शहरात नायलॉन मांजाची साठवणूक व विक्री पूर्णपणे बंद होईल, याची खात्री प्रशासनाने करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

​आमदार अमोल खताळ यांच्या या भूमिकेचे संगमनेरमधील सामाजिक संस्था, पक्षीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. “नायलॉन मांजामुळे निसर्गाचे आणि जीवांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे प्रशासनाने या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी,” अशी मागणी नागरिक करत आहेत.

​“हा मांजा केवळ दोरा नसून तो जीवघेणा फास आहे. कुणाचा तरी आनंद दुसऱ्याच्या जीवावर बेतू नये, यासाठी आम्ही ‘नायलॉन मांजामुक्त संगमनेर’ घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत." असे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर लाईव्ह शी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान ​प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत, नागरिकांनीही अशा विक्रेत्यांची माहिती प्रशासनाला देऊन हा सण सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन आमदार खताळ यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !