महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीजग्राहकांशी सौजन्याने वागावे
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या महावितरणच्या आढावा बैठक सूचना
संगमनेर LIVE | महावितरण कार्यालयात वीजबिल, वीज जोडणी, ट्रिपिंग तसेच इतर तक्रारी घेऊन येणाऱ्या वीजग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्या ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून तत्परतेने सोडवाव्यात. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक आहे, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संगमनेर शहर व तालुक्यातील वीजग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महावितरणच्या विभागीय कार्यालयात आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महावितरणच्या संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, उपकार्यकारी अभियंता प्रेमकुमार पाटील यांच्या सह संगमनेर तालुक्यातील सर्व विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी संगमनेर विभागाअंतर्गत येणारी सर्व सौर उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच निमोण वीज उपकेंद्र अंतर्गत कऱ्हे येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरणे, तळेगाव, दिघे, चिंचोली गुरव, घारगाव, कोकणगाव, देवगाव आणि पोखरी हवेली या ९ गावांमध्ये सौर केंद्रांची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. ती कामे संथ गतीने सुरू असून जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्या, अशा सक्त सूचना आमदार खताळ यांनी दिल्या.
संगमनेर विभागाअंतर्गत प्रस्तावित असलेल्या संगमनेर आणि निमज येथील ३३/११ के. व्ही. नवीन उपकेंद्राच्या कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच कोकणगाव, साकूर, हिवरगाव पावसा, निमोण, धांदरफळ, जवळे कडलग या उपकेंद्रात १० मेगावॉट पर्यंत तसेच कर्जुले पठार, देवगाव, पिंपरणे, तळेगाव येथे ५ मेगावॉट क्षमतापर्यंत वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर आढावा आमदार अमोल खताळ यांनी यावेळी घेतला.
तालुक्यात नव्याने मंजूर करण्यात आलेली वीज रोहित्रे व सोलर वीज प्रकल्प ही कामे संथगतीने सुरू आहेत. ती जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. तसेच वीज रोहित्रांची कमतरता, सोलर योजनेतील अडचणी व विविध वीज कामांबाबतचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली.
संगमनेर तालुक्यातील नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ कार्यान्वित करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. याशिवाय जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आलेल्या सर्वकामांची प्रगती तपासून ती कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
“संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात सोलर प्रकल्प उभारताना विविध अडचणी येत आहेत. त्या अडचणी शेतकऱ्यांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी पूर्णवेळ वीजपुरवठा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार आहेत. टप्प्याटप्प्याने वीज क्षमतेत वाढ करण्यात येत आहे.” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.