गोपाळ महाराज उरळकर याना ‘डॉ. विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार' जाहीर

संगमनेर Live
0
गोपाळ महाराज उरळकर याना ‘डॉ. विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार' जाहीर

◻️ ​मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत ६ मार्चला सन्मान सोहळ्याचे आयोजन


संगमनेर LIVE (​लोणी) | ​वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याच्या प्रसारासाठी पाच दशकांहून अधिक काळ निरपेक्ष सेवा देणारे विदर्भातील उरळ (जि. अकोले) येथील निष्काम कर्मयोगी ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. गोपाळ महाराज उरळकर यांची यावर्षीच्या प्रतिष्ठेच्या ‘पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सन २०१७ पासून हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली असून, शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी लोणी बुद्रुक येथे एका भव्य समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

​या पुरस्कारासाठी समितीकडे अनेक नावे विचाराधीन होती, मात्र उरळकर महाराजांचे आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन ही निवड करण्यात आली. विदर्भातील संत विचारांचा वारसा जपताना त्यांनी हे विचार शहरापासून खेड्यापाड्यापर्यत आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. 

पंढरपूर, आळंदी आणि देशातील विविध राज्यांमध्ये पायी दिंडी व पालखी सोहळ्यांच्या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी संत सेवा आणि समाज प्रबोधनाचे व्रत जोपासले आहे. विदर्भातील अनेक नामांकित वारकरी संस्थांवर ते विश्वस्त म्हणून कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवीन कीर्तनकार आणि प्रवचनकार घडले आहेत. आतापर्यत त्यांनी चार हजारांहून अधिक कीर्तने आणि प्रवचने केली असून, त्यांचे समर्पित जीवन वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी असल्याचे मत निवड समितीने व्यक्त केले आहे.

​येत्या ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लोणी बुद्रुक येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर प्रांगणात हा गौरव सोहळा संपन्न होईल. मानपत्र, स्मृती चिन्ह आणि ५१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि ह.भ.प. भारत महाराज धावणे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​या पुरस्काराची परंपरा अत्यंत मोठी असून, यापूर्वी ह.भ.प. पंढरीनाथ नाना तावरे, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भोंदे, ह.भ.प. नामदेव महाराज शामगावकर, स्वामी सागरानंद सरस्वती, शांतिब्रम्ह मारुतीबाबा कुर्हेकर, ह.भ.प. श्रावण बाबा कुंवरा, माऊली बाबा टाकळकर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली परदेशी यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यावर्षीच्या पुरस्कार घोषणेप्रसंगी ह.भ.प. भारत महाराज धावणे, ट्रस्टचे अध्यक्ष देविदास म्हस्के, लोणीच्या सरपंच कल्पनाताई मैड, नंदकिशोर राठी, अशोकराव धावणे, नानासाहेब म्हस्के, उपसरपंच गणेश विखे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !