राज्याच्या सर्वागीण विकासाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प - आमदार अमोल खताळ
◻️ शेतकरी, युवक आणि उद्योजकांसाठी अर्थसंकल्प हा ‘आशेचा किरण’
संगमनेर LIVE | महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, आरोग्य क्षेत्र आणि उद्योजकांसाठी यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत आश्वासक ठरला असून, तो राज्याच्या सर्वागीण विकासाला नवी दिशा देणारा आहे, अशी गौरवपूर्ण प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे. आज सादर झालेला हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले खंबीर पाऊल असून, बळीराजाच्या कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती अधिक सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यात दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.
शेती क्षेत्राबद्दल बोलताना आमदार खताळ म्हणाले की, फलोत्पादन वाढीसाठी नारळ, काजू, चंदन आणि अक्रोड उत्पादनावर दिलेला भर स्वागतार्ह आहे. विशेषतः कोकणातील नारळ बागायतदारांसाठी जाहीर झालेली ‘कोकोनट प्रमोशन स्कीम’ आणि प्रक्रिया उद्योगांना मिळणारी चालना ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारी ठरेल. तसेच मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मत्स्योद्योगाची पुरवठा साखळी सशक्त करण्यावर दिलेला भर अत्यंत महत्त्वाचा आहे.
आधुनिक युगाशी सांगड घालत शेतकऱ्यांसाठी ‘व्हर्च्युअल इंटीग्रेटेड सिस्टम टू एक्सेस अॅग्रीकल्चर रिसोर्स’ हे बहुभाषिक एआय (AI) टूल विकसित केल्यामुळे आता शेतकऱ्यांना हवी ती माहिती स्वतःच्या भाषेत सहज उपलब्ध होईल. दुग्धव्यवसाय आणि कुकुटपालनासाठी दिलेले विशेष अनुदान कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवक आणि शिक्षणाबाबत माहिती देताना आमदार खताळ यांनी सांगितले की, १५ हजार माध्यमिक शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ची स्थापना आणि गेमिंग व व्हीएफएक्स क्षेत्रात २० लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय हा भविष्यातील जागतिक संधी ओळखून घेतलेला एक क्रांतीकारी टप्पा आहे.
आरोग्य क्षेत्रातही केंद्र सरकारने मोठे दिलासे दिले असून, कॅन्सर व दुर्मिळ आजारांवरील औषधांवरील कर कमी केल्याने सामान्यांना स्वस्त उपचार मिळतील. तसेच तीन नवीन ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’ची स्थापना आणि अपघात विमा करमुक्त करण्याचा निर्णय आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करणारा आहे.
औद्योगिक विकासाचा आढावा घेताना आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, २०० जुने औद्योगिक क्लस्टर्स पुनरुज्जीवित केल्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. सेमीकंडक्टर उद्योगासाठी ४० हजार कोटींची तरतूद आणि डेटा सेंटर कंपन्यांना दिलेला ‘टॅक्स हॉलिडे’ भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवेल.
महिला सक्षमीकरणासाठी ‘She-Marts’ आणि मुलींच्या शिक्षणासाठी हॉस्टेल उभारणीचे निर्णय सामाजिक बदलासाठी दूरगामी ठरतील. शेती, उद्योग, तरुण आणि आरोग्य या चारही स्तंभांना समान प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला देशातील आघाडीचे राज्य बनवण्यात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.