सन्मान न मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार!

संगमनेर Live
0
सन्मान न मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार!

◻️​ म्हैसगाव येथील ‘घोंगडी बैठकीत’ रिपब्लिकन सेनेचा इशारा 


संगमनेर LIVE (​म्हैसगाव) | रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आगामी २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्षाने कंबर कसली आहे. केवळ सत्तेसाठी नव्हे, तर जनतेच्या मूलभूत हकांसाठी या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय रिपब्लिकन सेनेने घेतला आहे. दरम्यान, आगामी काळात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (शिंदे गट) विश्‍वासात न घेतल्यास रिपब्लिकन सेना ‘स्वबळावर’ निवडणूक लढवेल, असा स्पष्ट इशारा जिल्हाप्रमुख राजु आढाव यांनी दिला.

​आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील गाडगे बाबा आश्रम आणि यानंतर म्हैसगाव येथील बुद्ध विहारात आयोजित ‘घोंगडी बैठकी’त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात राजु आढाव यांनी युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आपली युती आहे. मात्र, नगर जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मित्रपक्षाने रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही. त्याचा फटका बसून शिंदे गटाला मतांची बेरीज वाढवता आली नाही. ही चूक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झाल्यास आणि आम्हाला विश्‍वासात न घेतल्यास, रिपब्लिकन सेना स्वबळावर पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल.” असा इशारा दिला.

यावेळी युवा जिल्हाध्यक्षाची चंद्रकांत जाधव यांनी फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्याना आणि संविधान प्रेमींना साद घातली. राहुरी तालुक्यातील प्रत्येक गट आणि गणात कार्यकर्त्याच्या बैठका आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी करावी आणि गावोगावी होणाऱ्या घोंगडी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जाधव यांनी केले.

३१ जानेवारी २०२६ रोजी म्हैसगाव येथील बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यानी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला.

​या बैठकीत अमोल मकासरे, भरत भांबळ, नंदू साळवे, चांगदेव भिसे, पत्रकार कमलेश विधाटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन युवा जिल्हा सचिव काजेंद्र विधाटे, युवा तालुका उपाध्यक्ष नानासाहेब विधाटे व सचिव सचिन विधाटे यांनी केले होते.

दरम्यान या कार्यक्रमास विनायक विधाटे, हरीश विधाटे, दिलीप लाहुंडे, विकास छत्रे, आकाश विधाटे, अजय विधाटे, रोहित विधाटे, रोहित साळवे, प्रवीण विधाटे, लक्ष्मण गुलदगड, भाऊसाहेब विधाटे, अनिकेत विधाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन कमलेश विधाटे यांनी केले, तर आभार नानासाहेब विधाटे यांनी मानले. अशी माहिती पत्रकार कमलेश विधाटे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !