संगमनेर पोलीस वसाहतीचे श्रेय घेणाऱ्यांची धडपड हास्यास्पद - आ. अमोल खताळ

संगमनेर Live
0
संगमनेर पोलीस वसाहतीचे श्रेय घेणाऱ्यांची धडपड हास्यास्पद - आ. अमोल खताळ

​◻️ सत्ता असताना गप्प बसणाऱ्यांना आताचं पोलिसांचा पुळका कसा?


​संगमनेर LIVE | संगमनेर मतदारसंघातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, हा विषय आपण विधानसभेत गांभीर्याने मांडला आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या वसाहतीची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, काम मार्गी लागत असल्याचे पाहून काही जणांकडून त्याचे श्रेय घेण्याची केविलवाणी धडपड सुरू झाल्याचा टोला आमदार अमोल खताळ यांनी पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांचे नाव न घेता लगावला.

​आमदार खताळ यांनी माहिती दिली की, संगमनेर शहर पोलीस ठाण्याशी संबंधित ३ अधिकारी निवासस्थाने आणि ६५ कर्मचारी निवासस्थाने १९५९ ते १९६८ या काळातील आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदीनुसार ही घरे अत्यंत जीर्ण झाली असून राहण्यासाठी अयोग्य आहेत. पावसाळ्यात पाणी घरात शिरणे, ड्रेनेज लाईनची दुरवस्था अशा अनेक समस्या पोलिसांना सहन कराव्या लागत आहेत. या प्रश्नावर मागील अधिवेशनात त्यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.

​पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला आहे. जुन्या आणि धोकादायक इमारती पाडून त्या ठिकाणी अद्ययावत, सुरक्षित आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त नवीन पोलीस निवासस्थाने बांधण्याचा निर्णय आता अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी स्वतंत्र निवासस्थानाची मागणीही प्रशासकीय स्तरावर मान्यतेच्या प्रक्रियेत आहे.

​“ज्यांच्या हातात अनेक वर्षे सर्व सत्तास्थाने होती, त्यांनी कधीही या प्रश्नावर एक शब्दही उच्चारला नाही. मात्र, आता काम पूर्णत्वाकडे जाताना त्यांना अचानक पोलिसांचा कळवळा कसा आला?” असा टोला आमदार अमोल खताळ यांनी आमदार सत्यजीत तांबे यांचे नाव न घेता लगावला.

​आमदार खताळ शेवटी म्हणाले की, “नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांना सुरक्षित घर मिळणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. हा मुद्दा श्रेयाचा नसून कर्तव्याचा आहे. महायुती सरकारच्या काळात हा प्रश्न सुटत आहे, याचेच आम्हाला समाधान आहे.” असे म्हटले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !