श्रेय कुणीही घ्या, पण काम वेळेत पूर्ण करा - डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर Live
0
श्रेय कुणीही घ्या, पण काम वेळेत पूर्ण करा - डॉ. सुजय विखे पाटील 


◻️ ​अतिक्रमणे स्वतःहून हटवा, अन्यथा कारवाई अटळ; २० फेब्रुवारीची ‘डेडलाईन’

◻️ राहुरी करांनी डॉ. विखेच्या माध्यमातून ‘अजित पवार’ स्टाईल अनुवली


संगमनेर LIVE (​राहुरी) | “आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ आणि प्रामाणिक भूमिका घेतो,” अशा शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून प्रशासन आणि ठेकेदारांना स्पष्ट सुनावले. राहुरी शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आयोजित बैठकीत त्यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली.

​राहुरी शहर हद्दीतील महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या २० फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट प्रशासनासमोर ठेवण्यात आले आहे. या कामात अडथळा ठरणारी महामार्गालगतच्या बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंतची सर्व अतिक्रमणे संबंधित व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून हटवावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले; अन्यथा प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्याचा इशाराही डॉ. विखे यांनी दिला आहे. दरम्यान, रस्त्याची उंची आणि गटारांच्या तांत्रिक रचनेमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणाऱ्या परिणामांच्या तक्रारींची दखल घेत, डॉ. विखे यांनी या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला जागेवरच दिले आहेत.

​राहुरी येथील ज्ञानेश्वर चित्र मंदिर येथे आयोजित या बैठकीत नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. गटारींची उंची वाढल्याने व्यवसायावर होणारा परिणाम आणि वाहतुकीची कोंडी यावर सविस्तर चर्चा झाली. यावर बोलताना डॉ. विखे म्हणाले की, काम पूर्ण होईपर्यंत काही काळ गैरसोय होईल, मात्र भविष्यातील पिढीचा विचार करून सर्वानी सहकार्य करणे गरजेचे आहे.

​“मी माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली आणि वाढीव कामांची मंजुरी वरिष्ठ पातळीवरून आणण्याची जबाबदारी माझी आहे. सध्या आंदोलन किंवा वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन काम पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. श्रेय कुणीही घ्यावे, पण राहुरीकरांचा त्रास संपणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

​बैठकीत उपस्थित नागरिकांनी पाणी निचरा, रस्त्याची उंची आणि दुकानांपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. डॉ. सुजय विखे यांनी या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने चुका दुरुस्त करण्याचे व कामाला गती देण्याचे निर्देश दिले.

​कोणतीही तडजोड न करता घेतलेले धाडसी निर्णय आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती पाहून उपस्थित अनेकांना स्वर्गीय अजित पवार यांच्या निर्णयक्षम बैठकींची आठवण झाली. पुढील एका महिन्यात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वानी साथ द्यावी, असे आवाहन करत त्यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !