हरीबाबा देवस्थानच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध - आमदार अमोल खताळ
◻️ वेल्हाळे येथील यात्रा उत्सवात आमदारांनी घेतला ‘रेवडी-दहिवड्या’चा आस्वाद
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील जागृत देवस्थान असलेल्या हरीबाबा देवस्थानच्या विकासासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असून, या क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. वेल्हाळे येथील हरीबाबा यात्रा उत्सवानिमित्त दर्शन घेऊन भाविकांशी संवाद साधताना त्यांनी ही ग्वाही दिली.
यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी देवस्थानच्या विकासाचा प्रगतीपुस्तक मांडले. ते म्हणाले की, यापूर्वीच देवस्थानच्या कामांसाठी २० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या देवस्थानला आता 'क' वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. भविष्यात या क्षेत्राला 'ब' वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच वेल्हाळे परिसरातील पाणीटंचाईची समस्या गंभीर असून, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने या भागाला कायमस्वरूपी पाणी कसे देता येईल, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत.
विरोधकांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना आमदार खताळ म्हणाले की, आपण देवाच्या दारी कधीच राजकारण करत नाही, मात्र दुर्दैवाने काही लोक विकासकामांचे खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. निधी देणारे आणि प्रत्यक्षात कामे करणारे आम्ही असूनही श्रेय घेणारे वेगळेच आहेत, हे चित्र जनतेने ओळखणे गरजेचे आहे. तालुक्यातील विविध मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, कोणत्याही टीका-टिपणीला उत्तर न देता केवळ विकासाच्या जोरावर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत.
दर्शनानंतर आमदार खताळ यांच्या साधेपणाचे दर्शन वेल्हाळे ग्रामस्थांना घडले. यात्रा समितीचा सन्मान स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट जत्रेतील संभाजी घारे यांच्या दुकानात भेट दिली. तिथे कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर बसून त्यांनी अत्यंत साधेपणाने भेळ, रेवडी आणि गुडीशेवच्या दहिवड्याचा आस्वाद घेतला. तसेच चहा आणि आईस्क्रीमच्या स्टॉलवर जाऊन दुकानदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. एका आमदाराने प्रोटोकॉल बाजूला सारून अशा प्रकारे सर्वसामान्यांत मिसळल्यामुळे वेल्हाळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, भाजपचे दादाभाऊ गुंजाळ, गोविंद जेडगुले, कैलास जडगुले, किशोर भांड, राजेंद्र कांडेकर, रावसाहेब कांडेकर, सुरज गुळवे, उमेश जेडगुले, अरुण जेडगुले, शरद गोफणे, अमोल जेडगुले, सागर चव्हाण, विकास भोईटे, अभि गोफणे, समीर गुळवे, अक्षय शिरतार यांसह महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मी कालही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ताच आहे. जनतेचे काम करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे यातच मला खरा आनंद मिळतो.” असे देखील आमदार अमोल खताळ म्हणाले आहेत.