“चांगल्या कामाचे कौतुक करणारा लोकनेता गमावला”
◻️संगमनेर येथील शोकसभेत बाळासाहेब थोरात यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
संगमनेर LIVE | स्वर्गीय विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत बसणारे महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. सहकार, शिक्षण आणि प्रशासन अशा सर्वच क्षेत्रांचा गाढा अभ्यास असलेल्या या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, १९९२ पासून आम्ही विधिमंडळ आणि मंत्रिमंडळात एकत्र काम केले असून राज्यभरात अनेक सभा एकत्रित गाजवल्या. त्यांचा स्वभाव अत्यंत रोखठोक होता आणि राज्याच्या हितासाठी प्रसंगी कटू निर्णय घेण्याची धमक त्यांच्यात होती.
संगमनेरशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करताना थोरात यांनी सांगितले की, १९९३ मध्ये पिंपळगाव माथा येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी ते आले होते, तेव्हा गावकऱ्यांनी दिलेले साधे जेवण दादांच्या कायम स्मरणात असायचे. थोरात कारखान्याच्या ५५०० मे. टन विस्तारीकरणाबाबतही ते नेहमी विचारणा करायचे. एकदा तर मी मुंबईत असताना ते अचानक कारखान्याच्या गेटवर आले, सुरक्षा रक्षकाकडून रीतसर परवानगी घेतली आणि संपूर्ण पाहणी करून या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले.
चांगल्या कामाची दखल घेऊन त्याचे कौतुक करणे हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते. सतत जनतेच्या गराड्यात राहणारे आणि कामाचा धडाका लावणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत, हे मन मानायला तयार नाही, अशा भावूक शब्दांत थोरात यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान या शोकसभेत उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनीही अजितदादांच्या शिस्तीचा आणि विकासकामांचा गौरव केला. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा आणि शब्दाला पक्का असणारा लोकनेता म्हणून त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील, असा सूर या शोक सभेत उमटला.