भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी माझी जीभ कापली तरी चालेल

संगमनेर Live
0
भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी माझी जीभ कापली तरी चालेल

◻️ हर्षवर्धन सपकाळाकडून टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भाजपवर सडकून टीका


संगमनेर LIVE (​मुंबई) | अदानी-अंबानी आणि अमेरिकेच्या हितासाठी काम करणाऱ्या, तसेच संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपाचा मी पर्दाफाश करत आहे, म्हणूनच भाजपाला माझी भीती वाटत आहे. त्यासाठी जर माझी जीभ कापायची असेल, तर खुशाल कापा; पण मी सत्याचा आवाज उठवणे आणि भाजपचे कारस्थान उघड करणे थांबवणार नाही, अशा प्रखर शब्दांत महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला ठणकावून सांगितले. 

भाजपच्या नेत्यांनी आणि आमदारांनी त्यांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, माझी जीभ कापल्यानंतर जर खरोखरच भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, तर मला ते मान्य आहे. जर ही अन्यायकारक व्यापार युती रद्द होऊन शेतमालाला योग्य भाव मिळणार असेल, देशातील बळीराजा संपूर्णपणे कर्जमुक्त होणार असेल आणि भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालण्याचे आपले राजकारण थांबवणार असेल, तर माझी जीभ नक्की कापा. इतकेच नव्हे तर, चीनने बळकावलेला भारताचा भूभाग जर यामुळे परत मिळणार असेल, तर मी कोणत्याही बलिदानास तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण देताना सपकाळ यांनी सांगितले की, मी महाराजांच्या प्रतिमेबद्दल किंवा कीर्तीबद्दल काहीही चुकीचे बोललेलो नाही. महाराजांची कीर्ती चंद्रकलेप्रमाणे निरंतर वाढत जावी, याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाने माझ्या विधानाचा 'ध' चा 'मा' करून मुद्दाम विपर्यास केला आहे. यामागे महाराष्ट्र पेटवण्याचा आणि दंगली घडवण्याचे मोठे कारस्थान असून जनतेने ते समजून घेतले पाहिजे.

​सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी आरोप केला की, एपस्टिन फाईल्समध्ये अनेक धक्कादायक बाबी दडलेल्या आहेत, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे. 

बेरोजगारी, महागाई आणि राज्यातील इतर ज्वलंत प्रश्नांवर आज भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस उत्तर नाही. म्हणूनच या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पडदा टाकण्यासाठी आणि स्वतःचे अपयश लपवण्यासाठी भाजपा वैयक्तिक हल्ले आणि धमक्यांचे खालच्या स्तरावरील राजकारण करत आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

दरम्यान कॉग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील भाजप आणि कॉग्रेसमधील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !