बाळासाहेब थोरात यांनी घेतली संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांची भेट!

संगमनेर Live
0
बाळासाहेब थोरात यांनी घेतली संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांची भेट!

◻️ वैचारिक वारसा आणि सांस्कृतिक ऐक्यावर झाली प्रदीर्घ चर्चा




संगमनेर LIVE (​सांगली) | दिल्ली येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका प्रा. तारा भवाळकर यांची कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 

या भेटीदरम्यान साहित्य, विचार आणि समाजकारण या त्रिसूत्रीवर आधारित प्रदीर्घ आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या प्रसंगी ताराबाईंनी स्वतः संपादित केलेले ‘आचार्य जावडेकर: पत्रे आणि संस्मरणे’ हे पुस्तक बाळासाहेब थोरात यांना स्नेहभेट म्हणून प्रदान केले. पुस्तकाच्या माध्यमातून विचारांचा वारसा जपण्याची त्यांची ही बांधिलकी या क्षणातून प्रकर्षाने जाणवून आली.

​दिल्लीतील साहित्य संमेलनातील ताराबाईच्या अध्यक्षीय भाषणानंतर साहित्य आणि राजकारणासह विविध क्षेत्रात उमटलेल्या विविध प्रतिक्रिया, विचारांची देवाणघेवाण आणि त्याचे व्यापक सामाजिक परिणाम यावर या भेटीत मनमोकळी चर्चा झाली. 

यावेळी संवाद साधताना तारा भवाळकर यांनी विशेषत्वाने नमूद केले की, संतांचा विचार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे आणि आपल्या विविध बोलीभाषांनी महाराष्ट्राला अधिक समृद्ध केले आहे. त्यांच्या या विवेचनातून मराठी भाषेची व्यापकता आणि सांस्कृतिक ऐक्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ​याचवेळी संगमनेर येथे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेल्या पूर्वीच्या भेटींच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. 

बाळासाहेब थोरात यांनी या भेटीत साहित्य, संस्कृती, सद्यस्थितीतील राजकारण आणि समाजकारण यासह महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेल्या प्रगल्भ राजकीय परंपरेबाबत सविस्तर विचार मांडले. साहित्यातील विचारांची समाजाला असलेली गरज व्यक्त करत थोरात यांनी माजी संमेलन अध्यक्षा तारा भवाळकर यांना संगमनेर भेटीचे आग्रहाचे निमंत्रणही दिले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !