सेवा आणि संस्कारांचा ‘यशोधन' वारसा - आरोग्यदुत डॉ. जयश्रीताई थोरात
◻️ रुग्णसेवेतून जनसेवेकडे जाणारा एक शांत, संयमी आणि आश्वासक प्रवास
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘थोरात’ हे नाव केवळ सत्तेचे नाही, तर ‘संस्कारांचे’ प्रतीक आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा साधेपणा, संयम आणि विकासाची दूरदृष्टी संपूर्ण राज्याला परिचित आहे. हाच समाजकारणाचा आणि जनसेवेचा वारसा समर्थपणे पेलत, आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजाच्या वेदना कमी करण्यासाठी करणाऱ्या, संगमनेरच्या ‘आरोग्यदुत’ डॉ. जयश्रीताई थोरात यांचा आज रविवारी (दि. १५) वाढदिवस!
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची नात आणि राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या असूनही, डॉ. जयश्रीताईंनी आपली ओळख कधीही ‘वडिलाच्या नावावर’ निर्माण केली नाही. एमबीबीएस आणि त्यानंतर ब्लड कॅन्सर सारख्या गंभीर विषयावर एमडी करताना त्यांनी नेहमीच स्वतःला एक सामान्य विद्यार्थिनी मानले.
याचा एक प्रसंग आजही सांगितला जातो. वैद्यकीय शिक्षण घेताना प्राचार्यानी त्यांना विचारले, “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत, तुम्ही ही थोरात?” तेव्हा जयश्रीताईनी अतिशय नम्रपणे सांगितले की, “ते माझे आजोबा आहेत.” जेव्हा प्राचार्यानी विचारले की, “तुम्ही मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या असूनही हे कधी सांगितले का नाही?” तेव्हा त्या म्हणाल्या, “माझे वडील आणि आजोबांचा साधेपणा हाच आमच्या परिवाराचा संस्कार आहे. शिक्षणामध्ये मी त्यांचे नाव कशाला पुढे करू?” ही उत्तरेच त्यांच्यातील संस्कारांची पावती देतात.
कॅन्सर तज्ज्ञ म्हणून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सेवा सुरू केली. रक्ताचा कर्करोग या अत्यंत क्लिष्ट विभागामध्ये काम करताना त्यांनी कधीही दिवस-रात्र पाहिली नाही. सलग २४-२४ तास सेवा देऊन त्यांनी अनेक रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. केवळ उपचारच नव्हे, तर रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम त्या अविरत करत आहेत. कोरोनाच्या भीषण संकटात जेव्हा जग थांबले होते, तेव्हा डॉ. जयश्रीताई स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रुग्णालयात अहोरात्र सेवा देत होत्या.
रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या डॉ. जयश्रीताईनी ‘एकविरा फाउंडेशन'च्या माध्यमातून समाजकारणात एक वेगळा ठसा उमटवला आहे. आरोग्य हाच ध्यास मानून त्यांनी संगमनेर तालुक्यात आरोग्य शिबिरे, हिमोग्लोबिन तपासणी आणि कॅन्सर जनजागृतीचा यज्ञ सुरू केला.
संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या पठार, प्रवरा आणि तळेगाव अशा पट्ट्यांमध्ये विभागलेला आहे. मात्र, डॉ. जयश्रीताईनी प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन लोकांच्या सुख-दुःखात सहभाग नोंदवला. महिलांशी होणारा त्यांचा सहज संवाद, ज्येष्ठांना वाकून केलेला नमस्कार आणि तरुणांच्या खांद्यावर हात ठेवून दिलेला विश्वास, यामुळे त्या संगमनेरकरांच्या कुटुंबातील एक सदस्य झाल्या आहेत.
राजकारणात अनेकदा वादळे येतात, पण त्या वादळांना शांततेने सामोरे जाण्याची कला त्यांना वारशाने मिळाली आहे. युवक कॉग्रेसचे अध्यक्षपद असो किंवा तालुक्यातील कठीण प्रसंगातील राजकीय पेच, डॉ. जयश्रीताई कधीही डगमगल्या नाहीत. उलट, अत्यंत शांत डोक्याने आणि संयमाने त्यांनी परिस्थिती हाताळली. त्यांच्या या स्वभावाचे कौतुक केवळ तालुक्यातच नाही, तर राज्यभरात झाले.
आई सौ. कांचनताई थोरात, मामा डॉ. सुधीर तांबे आणि आत्या सौ. दुर्गाताई तांबे यांच्याकडून मिळालेले सामाजिक बाळकडू आणि वडिल बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन यामुळे डॉ. जयश्रीताई आज एक परिपक्व नेतृत्व म्हणून समोर येत आहेत.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर विजय मिळवून देणाऱ्या या ‘डॉक्टर’ आता समाजातील अनिष्ट रूढी आणि समस्यांच्या ‘कॅन्सर’वर उपचार करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. रुग्णसेवेतून जनसेवेचा, आणि उपचारातून उद्धाराचा हा प्रवास असाच अविरत सुरू राहो, हीच सदिच्छा!
तर, संगमनेरची ‘अस्मिता’ आणि आरोग्याचा ‘वसा’ जपणाऱ्या डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
लेखक श्री. नामदेव कहांडळ हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे माध्यम समन्वयक असून लोकप्रिय निवेदक देखील आहेत.