आमदार खताळ यांच्या मध्यस्थीनंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

संगमनेर Live
0
आमदार खताळ यांच्या मध्यस्थीनंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

◻️ ​प्रशासकीय बैठकीत कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय


​संगमनेर LIVE | ​संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाला अखेर मोठे यश मिळाले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे टोल प्रशासनाने नमती भूमिका घेत कामावरून कमी केलेल्या २२ कर्मचाऱ्यांना तत्काळ पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार खताळ यांच्या हस्ते नारळपाणी देऊन हे उपोषण अधिकृतपणे मागे घेण्यात आले.

​पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर अनेक वर्षापासून स्थानिक तरुण कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र, नव्याने आलेल्या जे. आर. रोडवेज कंपनीचे मालक राजपाल यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय २२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात करण्यात आली होती. या अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले होते.

​प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासकीय विश्रामगृह येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार अमोल खताळ यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर पी. डी. कदम, टोल प्लाझा कंपनीचे मॅनेजर अनुप शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, शिवसेना नेते श्याम राहाणे, भाजपचे महेश मांडेकर आणि टोल प्लाझा वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष विलास राहाणे हे उपस्थित होते.

​या बैठकीत प्रदीर्घ चर्चेअंती कर्मचाऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार कामावरून कमी केलेल्या सर्व २२ कर्मचाऱ्यांना कोणत्याही अटीविना तत्काळ पुन्हा कामावर सामावून घेण्याचे प्रशासनाने मान्य केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात केलेली कपात पूर्णपणे रद्द करून त्यांना पूर्ववत पूर्ण पगार दिला जाणार आहे. १४ कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्नही मार्गी लागला असून, विधी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून पुढील आठवड्यात हे वेतन अदा केले जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि पीएफ संदर्भातील प्रलंबित विषयांवर तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात प्रीती बिल्डर कंपनीच्या मालकांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

​गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कामगारांच्या पाठीशी आमदार अमोल खताळ खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी केवळ अधिकाऱ्यांशी चर्चाच केली नाही, तर कामगारांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याचा शब्द दिला. “कामगारांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यांच्या हस्ते नारळपाणी घेऊन कर्मचाऱ्यांनी विजयी घोषणा देत आंदोलन संपवले.

​या आंदोलन लढ्यात हरिभाऊ राहाणे, सोपान दुधवडे, पांडुरंग काळे, रामदास दुधवडे, खंडू काळे, रवींद्र काळे, रवींद्र मेंगाळ, नवनाथ दुधवडे, सागर दुधवडे, सचिन काळे, दीपक दुधवडे, राहुल मधे, विनीत दुधवडे, सुनील काळे, बाळासाहेब काळे, भाऊसाहेब काळे, प्रीतम दुधवडे, अजय केदार, विकास दुधवडे, लक्ष्मण दुधवडे, निलेश मधे, सचिन दुधवडे, अनिल फोडसे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान हा विजय केवळ आमचा नसून सत्याचा आणि एकजुटीचा आहे. आमदार साहेबांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आज आम्हाला आमचा रोजगार परत मिळाला. अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !