जिल्हा बॅक ही जिल्ह्याच्या विकासाची ‘मातृसंस्था’ - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेरमध्ये जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
संगमनेर LIVE | सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासोबतच, पीक कर्जाच्या माध्यमातून जिल्हा बॅकेने सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधार दिला आहे. बॅकेकडे असलेल्या ११ हजार कोटींच्या ठेवी हे केवळ आकडे नसून, तो जनतेने बॅकेवर दाखवलेला मोठा विश्वास आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅकेच्या संगमनेर शाखेच्या ‘तालुका विकास अधिकारी’ कार्यालयाचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा आणि ‘सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहा’चे लोकार्पण प्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले होते.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाऊसाहेबांनी ४४ वर्षे संचालक आणि १८ वर्षे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम करताना सहकारात शिस्त आणि पारदर्शकता रुजवली. गाव पातळीवरील सेवा सोसायट्या सक्षम करण्यासाठी आणि सचिवांच्या हितासाठी ते नेहमीच आग्रही असत, याची आठवण त्यांनी करून दिली.
संगमनेर शाखेच्या इमारतीचा इतिहास सांगताना थोरात म्हणाले की, या इमारतीचे भूमिपूजन २९ जुलै १९७६ रोजी माझे आजोबा संतोजी थोरात यांच्या हस्ते झाले होते. गेल्या ५० वर्षाच्या या प्रवासात बॅकेने शेतकऱ्यांचा मोठा विश्वास संपादन केला असून संगमनेर तालुक्यातील कर्ज वसुलीची चांगली संस्कृती ही राज्यासाठी नेहमीच आदर्श ठरली आहे. तसेच बॅकेने केवळ कर्ज वाटपापुरते मर्यादित न राहता भविष्यातील आव्हानांचा अभ्यास करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
ऊस आणि इतर पिकांच्या बदलत्या पद्धतीवर बँकेने विशेष अभ्यास गट नेमावा, तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापारी कराराचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल, याचे विश्लेषण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तूंवर कर नसणे आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर असणे यासारख्या धोरणांमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बॅकेने एक अभ्यासू भूमिका मांडावी, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात चंद्रशेखर घुले यांनी बॅकेच्या प्रगतीचा आढावा घेत आगामी आधुनिक योजनांची माहिती दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व स्वर्गीय मारुतराव घुले यांचा स्नेहबंध कायम राहिला असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरने राज्याला कायम दिशा दिली असल्याचे त्यांनी गौरवाने सांगितले.
बॅकेने आता पारंपरिक पद्धती सोडून कॉर्पोरेट बॅकिंग प्रणाली आत्मसात करण्यावर भर दिला असून, लवकरच जिल्ह्यातील सर्व सोसायट्यांच्या माध्यमातून ‘क्यूआर कोड' प्रणाली राबवण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बॅकेने अवघ्या ८ टक्के व्याजाने सोनेतारण कर्ज सुरू केल्याचेही त्यांनी जाहीर केले.