महाशिवरात्रीनिमित्त निझर्णेश्वर देवस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
◻️ आमदार अमोल खताळ सपत्नीक अभिषेक आणि महापूजा करणार
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र निझर्णेश्वर देवस्थान' येथे आज रविवारी (दि. १५) महाशिवरात्रीनिमित्त पहाटे आमदार अमोल खताळ हे सपत्नीक अभिषेक आणि महापूजा करणार आहेत. तसेच दिवसभर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब जोंधळे यांनी दिली.
रविवारी पहाटे ५ वाजता आमदार अमोल खताळ हे पत्नी सौ. नीलम खताळ याच्या समवेत विधिवत अभिषेक आणि महापूजा करणार आहेत. उत्सवासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी निझर्णेश्वर देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे. मंदिर व संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांसाठी दर्शन रांग, स्वागत कक्ष आणि देणगी कक्षाची स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे.
भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीसाठी मोफत प्राथमिक उपचार कक्षाची सोय करण्यात आली आहे. तसेच सामाजिक भान जपत ‘रक्तदान शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्सवानिमित्त मंदिर परिसर पूजा साहित्य, मिठाई, आणि विविध खाऊ तसेच लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानांनी सजला आहे.
दरम्यान, भगवान महादेव यांच्या भव्य अशा नवीन मंदिराच्या बांधकामाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. या पवित्र कार्यात शिवभक्त आणि भाविकांनी सढळ हाताने दान करावे, असे आवाहन निझर्णेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्तानी केले आहे.
निझर्णेश्वरच्या भगवान महादेवावर निस्सिम श्रध्दा असल्यामुळे राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर आणि हजारों भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता विश्वस्त मंडळाने वर्तवत त्या दृष्टीने तयारी केली आहे.