संगमनेरच्या रस्त्यांसाठी ९७ कोटी २५ लाख रुपये मंजूर - आमदार अमोल खताळ
◻️ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून पायाभूत सुविधांना बळ
संगमनेर LIVE | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार व कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने संगमनेर तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ९७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा टप्प्याटप्याने विकसित केल्या जातील, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
कुंभमेळा आयोजनाच्या दृष्टीने मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये संगमनेर पंचायत समिती ते तळेगाव फाटा, तळेगाव फाटा ते निळवंडे फाटा, आणि निळवंडे फाटा ते जांभुळवाडी फाटा मार्गाचा समावेश आहे. या मार्गासाठी एकूण ९७ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामांमुळे भाविकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल तसेच तालुक्याच्या पायाभूत विकासाला मोठी चालना मिळेल. सध्या जास्त कालावधी लागणाऱ्या कामांना प्राधान्य देत नियोजित रस्त्यांची कामे मार्गी लावली जात आहेत. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या, त्यांची आस्था व होणारी गर्दी लक्षात घेऊन महायुती सरकार पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन या सर्वाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी येणार्या भाविकांना सुरक्षित आणि वेगवान दळणवळण मार्ग उपलब्ध करण्याच्या दृष्टीने संगमनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी ९७ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. रस्त्यांची दर्जेदार कामे भविष्यातील औद्योगिक व पर्यटन विकासाला पूरक ठरणार आहेत.” असे आमदार अमोल खताळ म्हणाले.