बाळासाहेब थोरात यांनी घेतली ज्येष्ठ विचारवंत डॉ. अ. ह. साळुंखे यांची भेट
◻️ “बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्वाची समाजाला गरज”
संगमनेर LIVE (सातारा) | यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी महसूल मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातारा येथे ज्येष्ठ विचारवंत व प्रसिद्ध लेखक डॉ. अ. ह. साळुंखे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उभयतांमध्ये राज्यातील राजकारण, साहित्य, समाजकारण आणि वारकरी संप्रदायाची संस्कृती अशा विविध वैचारिक विषयांवर सखोल आणि आत्मीय चर्चा झाली.
याप्रसंगी डॉ. साळुंखे यांच्या कार्याचा गौरव करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, विचारांप्रती निष्ठा जपणारे आणि समाजापर्यत सत्य पोहोचावे यासाठी आयुष्यभर लेखणी झिजवणारे डॉ. साळुंखे हे थोर साहित्यिक आहेत. आजही ते आपल्या लेखनातून समाजभान जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असून त्यांनी लिहिलेले ‘विद्रोही तुकाराम’ हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचण्यासारखे आहे. रूढी-परंपरांच्या विरोधात तुकाराम महाराजांनी जो आवाज उठवला, त्याचे प्रभावी चित्रण या पुस्तकात असून संत आणि समाजसुधारक यांचा सुंदर मिलाप डॉ. साळुंखे यांनी मांडला आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे, असेही थोरात यांनी यावेळी नमूद केले.
या भेटीचे औचित्य साधून संत चोखामेळा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनकार्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. चोखामेळा यांच्या कुटुंबात पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणे बंका असे पाचही सदस्य अभंगरचनाकार व विठ्ठलभक्त होते. या सर्वानी तत्कालीन विषम समाजव्यवस्थेविरुद्ध आणि मंदिर प्रवेश बंदीविरुद्ध मोठा संघर्ष केला.
त्यांच्या शब्दांना आणि विचारांना कोणीही रोखू शकले नाही, हे त्यांच्या अभंगांतून सिद्ध होते. यावेळी “अबीर गुलाल उधळीत रंग” आणि “अवघा रंग एक झाला” यांसारख्या अजरामर अभंगांच्या स्मृतींना उजाळा देत वारकरी संप्रदायातील अद्वैत भक्तीच्या प्रतीकांवर उभयतांमध्ये संवाद झाला.
बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. साळुंखे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब थोरात यांच्यासारखे दुर्मिळ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आजचे राजकारण दुर्दैवी वळणावर असताना त्यांच्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्वाची समाजाला खरी गरज आहे. नाशिक येथील साहित्य संमेलनात त्यांनी केलेले भाषण आणि साहित्यिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात असल्याचे डॉ. साळुंखे यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान याप्रसंगी डॉ. अ. ह. साळुंखे यांनी आपली ‘चोखिया’ आणि ‘बळीवंश’ ही पुस्तके बाळासाहेब थोरात यांना भेट दिली.