“एजंटांना पैसे देऊ नका, जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा” - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
“एजंटांना पैसे देऊ नका, जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा” - आमदार अमोल खताळ 

◻️ ६ हजारहून अधिक प्रस्तावांना मंजुरी; दोन हजार कामगारांना गृहपयोगी संच वाटप


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया विनामूल्य राबविण्यात येत असून बांधकाम कामगारांनी कोणत्याही एजंटांना पैसे न देता थेट महायुती जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज भरून लाभ घ्यावा, असे आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचे फॉर्म भरण्यासाठी काही ठिकाणी एजंटांकडून पैसे घेतले जात असून फसवणूक केल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना बळी न पडता नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून एक रुपयाही न देता योजनांचे अर्ज भरावेत, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. कोणी पैसे मागत असल्यास किंवा अडवणूक करत असल्यास गुप्तपणे माहिती द्यावी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असून संगमनेरात शिवसेनेचा आमदार असल्यामुळे विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुती सरकारच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आवाहन आमदार खताळ यांनी उपस्थितांना केले. तसेच महायुती सरकाराच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांचा लाभ देऊन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी यावेळी व्यक्त केला. 

संगमनेर शहरात पार पडलेल्या कार्यक्रमात आज शनिवारी (दि. १४) दोन हजार बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच देण्यात आले. तसेच यापुर्वी एकूण तेरा हजार बांधकाम कामगारांना आमदार अमोल खताळ यांच्या सहकार्याने संगमनेर येथे गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय विविध बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील ६ हजार १४४ लाभाचे प्रस्ताव अर्ज मंजूर करून ६ कोटी ३५ लाख ४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

एकूण ६ हजार १४४ लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांतर्गत अर्थसहाय्याचे यशस्वी वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा शैक्षणिक योजनेचा असून, ५ हजार ८४१ विद्यार्थ्यांना ५ कोटी ७२ लाख २७ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. आरोग्य सुविधेसाठी १९ लाभार्थ्यांना ६ लाख ७२ हजार रुपये, तर सामाजिक योजनेअंतर्गत १२४ प्रकरणांमध्ये २९ लाख २५ हजार रुपयांचे सहाय्य करण्यात आले आहे. यासोबतच, विशेष अर्थसहाय्य योजनेतून ६० लाभार्थ्यांना ३० लाख ३२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असून, या सर्व योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

दरम्यान गृहपयोगी वस्तू संच वाटप कार्यक्रमाला व्यासपीठावर बांधकाम अधिकारी सौरभ हामंद, उदय सूर्यवंशी, प्रकाश भोसले, शेतकरी नेते संतोष रोहम, वसंतराव देशमुख, विठ्ठलराव घोरपडे, रामभाऊ राहाणे, राजेंद्र सोनवणे, विनोद सूर्यवंशी, गुलाब भोसले, गोकुळ दिघे, पायल ताजणे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, संदीप देशमुख, कविता पाटील, संगीता पुंड, सपना जाधव, दिपाली वाव्हळ, अश्विनी कोल्हे आदी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !