आश्‍वी महाविद्यालयात ‘सूत्रसंचालन’ आणि 'स्टॉक मार्केट' कार्यशाळा संपन्न

संगमनेर Live
0

आश्‍वी महाविद्यालयात ‘सूत्रसंचालन’ आणि 'स्टॉक मार्केट' कार्यशाळा संपन्न 

◻️प्रभावी संवाद आणि आर्थिक साक्षरतेचे धड्यांना विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीएस महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्याच्या सर्वागीण प्रगतीसाठी विविध नाविन्यपूर्ण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. ‘सूत्रसंचालन कौशल्य’ आणि ‘शेअर बाजार तांत्रिक विश्लेषण’ या विषयांवरील या सत्रांनी विद्यार्थ्याच्या ज्ञानात मोलाची भर घातली.

​यातील सूत्रसंचालन कार्यशाळेत बेलापूर महाविद्यालयातील प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी संवादकौशल्य, आत्मविश्‍वासपूर्ण संवाद, आवाजातील चढ-उतार, योग्य शब्दोच्चार, वेळेचे व्यवस्थापन आणि कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे यांनी विद्यार्थ्याना सूत्रसंचालनातील बारकावे समजावून सांगतानाच, विविध उपक्रमांत सहभाग घेऊन अशा कला आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या सत्राचे प्रास्ताविक प्रा. गणेश खेमनर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रतीक्षा खरात व प्राजक्ता मुन्तोडे यांनी केले.

​कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 'टेक्निकल ॲनालिसिस ऑफ स्टॉक मार्केट' या विषयांतर्गत राहुरी महाविद्यालयातील प्रा. विजय पाटोळे यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीची मूलतत्त्वे, चार्ट विश्लेषण आणि ट्रेंड ओळखणे यांसारख्या महत्त्वपूर्ण संकल्पना पीपीटीद्वारे मांडल्या. त्याचप्रमाणे राहाता महाविद्यालयातील प्रा. शेखर ब्राह्मणे यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व विशद करत गुंतवणूक निर्णय प्रक्रियेत तांत्रिक विश्लेषणाची भूमिका अधोरेखित केली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी देखील प्राचार्य देविदास दाभाडे होते.

​याच उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पर्यावरण संवर्धन विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. दत्तात्रय लोखंडे व प्रा. योगिता तळेकर यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. या निमित्ताने रासेयो स्वयंसेवकांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. आदिनाथ घोलप यांनी यशस्वी जनजागृती घडवून आणली.

दरम्यान ​विद्यार्थी विकास मंडळाच्या समन्वयक डॉ. सुवर्णा घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. लतिफ शेख यांनी या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन केले. या सत्राचे सूत्रसंचालन आदेश्री लावरे व वैष्णवी डेंगळे यांनी केले, तर प्रा. नीतू मांढरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या उपक्रमास विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.


Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !