निमगावजाळी येथे विवाहितेची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या
◻️ आश्वी पोलीस ठाण्यात पती आणि सासूवर गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील माधुरी मनोज अरगडे (वय - २८) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडील बाळासाहेब रंगनाथ कोटकर (रा. अंभोरे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत माधुरी हिचे लग्न १० वर्षापूर्वी निमगावजाळी येथील मनोज भास्कर अरगडे याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर घरगुती कारणावरून पती मनोज आणि सासू मिराबाई अरगडे यांनी माधुरीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला वारंवार शिवीगाळ व मारहाण केली जात असे. या त्रासाला कंटाळून डिसेंबर २०२५ मध्ये माधुरी आपल्या दोन मुलांसह (शिवांश आणि विरांश) माहेरी अंभोरे येथे निघून आली होती.
काही दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या मध्यस्थी आणि चर्चेनंतर तिला पुन्हा नांदण्यासाठी सासरी पाठवण्यात आले होते. मात्र, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी माधुरी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती सासरच्या मंडळींनी माहेरच्यांना दिली. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
१२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास औरंगपूर गावच्या शिवारातील एका शेततळ्यात माधुरीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सासरच्या सततच्या छळाला कंटाळूनच माधुरीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान पोलिसांनी पती मनोज अरगडे आणि सासू मिराबाई अरगडे यांच्याविरुद्ध गु.र.न. १९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आश्वी पोलीस करत आहे.