“पाणी देण्याची जबाबदारी आमचीच” - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
“पाणी देण्याची जबाबदारी आमचीच” - आमदार अमोल खताळ

◻️ सावरगाव तळ येथे ​५ कोटी ७१ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

 ◻️उपसा जलसिंचन योजनेतून तहानलेल्या गावांना मिळणार पाणी


​संगमनेर LIVE | तळेगाव-निमोण आणि साकुर पठार भागाप्रमाणेच सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि झोळे या गावांचा प्रलंबित पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या भागाला उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली असून, नागरिकांनी आता पाण्याची कोणतीही काळजी करू नये, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. 

सावरगाव तळ येथे ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला, त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

​यावेळी आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यासाठी आलेल्या निधीवर भाष्य करताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्याला विक्रमी निधी मिळाला आहे. निळवंडे उजव्या कालव्यावरून उपसा जलसिंचन योजनेद्वारे वंचित गावांना पाणी मिळवून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ पाटील यांनी सुरू केलेल्या परंतु मध्यंतरी अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य राहील.

​राजकीय विरोधकांचा समाचार घेताना आमदार खताळ म्हणाले की, गेल्या ४० वर्षात जो विकास झाला नाही, तो आम्ही अत्यंत कमी कालावधीत करून दाखवत आहोत. काही लोक केवळ प्रसिद्धीसाठी आम्हीच निधी आणला असा खोटा दावा करत आहेत, मात्र जर खरोखरच त्यांनी हा निधी आणला होता, तर गेल्या चार दशकांत ही कामे का पूर्ण झाली नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

​या कार्यक्रमांतर्गत नूतन ग्रामपंचायत इमारत, सुसज्ज सभामंडप, व्यायामशाळा साहित्य, स्मशानभूमी सुशोभीकरण आणि ग्रामदैवत म्हसोबा महाराज मंदिर रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालय परिसरात सोलर हायमास्ट दिवे बसवण्यात येणार असून पिंपळगाव माथा-सावरगाव तळ-चंदनापुरी या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला.

दरम्यान ​या कार्यक्रमाला रामभाऊ राहाणे, गुलाब भोसले, प्रमोद राहणे, मधुकर थिटमे, सरपंच अनिता नेहे, अशोक कानवडे, गणेश दवंगे, श्याम राहाणे, अमित राठी, निलेश कनोजे, नितिन जोर्वेकर, दशरथ गाडे, परसराम नेहे, पोपट नेहे, रावसाहेब थिटमे, बाळासाहेब शेटे, सुधाकर नेहे, बाळासाहेब नेहे, लता नेहे, गीतांजली शिरतार, रोहिदास शिरतार, उद्योजक गोरक्ष गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !