आश्वी पोलिसांकडून वाळू तस्करीच्या झेनॉनसह मुद्देमाल ताब्यात
◻️ अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांना लगाम घालण्यास सुरुवात केली असून, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास केलेल्या एका कारवाईत पोलीसांनी एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास चिंचपूर चौफुली येथे पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान एक संशयास्पद झेनॉन पिकअप वाहन अडवून त्याची झडती घेतली असता, त्यात विनापरवाना बेकायदेशीर रित्या भरलेला वाळूसाठा पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी या कारवाईत दीड लाख रुपये किमतीचे वाहन आणि तीन हजार रुपयांची वाळू असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालक मयुर वेळेस यासह एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २९/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र पारथी करत आहेत.
दरम्यान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे कोणतेही अवैध वाळू तसेच गौण खनिज वाहतूक खपवून घेतली जाणार नाही आणि तस्करांना आळा घालण्यासाठी भविष्यातही विशेष मोहीम ही सुरूच राहील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.