आश्‍वीच्या पूनम खेमनरची ‘इंटर-झोनल’ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

संगमनेर Live
0
आश्‍वीच्या पूनम खेमनरची ‘इंटर-झोनल’ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

◻️​ मुंबई इंडियन्सची ‘स्टार ऑलराऊडर’ आता पश्चिम विभाग संघाकडून मैदान गाजवणार


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथील रहिवासी आणि मुंबई इंडियन्सच्या महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू पूनम खेमनर हिने आपल्या यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या प्रतिष्ठित ‘इंटर-झोनल महिला क्रिकेट स्पर्धे’साठी पूनमची निवड करण्यात आली असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

​सीनियर महिला एकदिवसीय देशांतर्गत लीगमधील उत्तुंग कामगिरीच्या जोरावर निवड समितीने पूनमच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करताना तिने आपल्या बॅट आणि बॉल दोन्हीने प्रतिस्पर्धी संघांना घाम फोडला. तिने या स्पर्धेत २८५ धावा कुटल्या आणि महत्त्वपूर्ण ५ बळी घेत आपली अष्टपैलू क्षमता सिद्ध केली. पूनमच्या या यशात प्रशिक्षक हेमंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या देखरेखीखाली तिने आपल्या खेळात मोठी सुधारणा केली आहे.

​पूनमने केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्येच नव्हे, तर महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या अष्टपैलू कामगिरीने क्रीडा विश्‍वाचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्या मैदानावरील जबरदस्त जिद्दीची दखल खुद्द रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनीही घेतली होती. त्यांनी तिला फोन करून तिच्या खेळाचे कौतुक केल्याने पूनमचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला आहे.

आश्‍वीसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत पश्चिम विभाग संघातून खेळताना तिला राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्याची मोठी संधी मिळाली आहे.

दरम्यान ​पूनमच्या या निवडीनंतर आश्‍वीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. मेहनत, समर्पण आणि सातत्य यांच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे. तर, आगामी काळात पूनमची खेळाप्रती असलेली निष्ठा तिला नक्कीच भारतीय संघाच्या जर्सीपर्यंत घेऊन जाईल. असा विश्‍वास सर्वत्र व्यक्त केला जात असून पूनमने आता बंगळुरू येथील मैदान गाजवावे अशा शुभेच्छा ग्रामस्थांनी तिला दिल्या आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !