रेल्वे मार्गातील बदलाचे पाप उघड होण्याच्या भीतीने त्यांना दिल्ली भेटीची चिंता
◻️ बाळासाहेब थोरात यांनी अकोलेकरांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गुलाबराजे भोसलेचां आरोप
संगमनेर LIVE | महाविकास आघाडी सरकारच्या काळात रेल्वे मार्गामध्ये बदल करण्याचे पाप उघडे पडण्याच्या भीतीमुळेच पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दिल्ली भेटीची माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना अधिक चिंता असल्याचा टिका भाजपाचे गुलाब भोसले यांनी केली
माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर भोसले यांनी जोरदार टिका केली आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग मूळ आराखड्या प्रमाणे संगमनेर अकोले तालुक्यातून जाणार होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना यामध्ये बदल केल्याची कबुली माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पिंपरणे येथील जाहीर सभेत दिली. त्यामुळे रेल्वे मार्गाबाबत कोणाच्या मनात खोट आहे हे लपून राहिलेले नाही.
पालकमंत्री विखे पाटील यांनी पहिल्यापासून रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्कात राहून रेल्वे मार्ग पहील्या मूळ आराखड्या प्रमाणेच व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत. लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा बदलण्याचा कोणताही निर्णय होवू नये आशी भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे अनेकांची अडचण आता झाली आहे. मूळ आराखड्यात कोणी बदल केला हे सुध्दा समोर आल्याने संगमनेर अकोले तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे खरे मारेकरी कोण जनतेला कळून चुकले असल्याचे भोसले यांनी पत्रकात म्हणले आहे.
अकोले तालुक्यातून रेल्वे मार्ग जावा आशी इच्छा तिथल्या जनतेची आहे. जेष्ठ नेते स्व. मधुकराव पिचड यांनी यासाठी पाठपुरावा केला. देवठाण येथील कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी जाहीर भूमिका मांडून देवठाण येथूनच रेल्वे मार्ग जाण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पण माजी आमदार बाळासाहेब थोरात अकोले तालुक्यातून रेल्वे मार्ग जावा म्हणून काहीही बोलत नाही. याचाच अर्थ महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना अकोले तालुक्यातील जतनेच्या पाठीत कोणी खंजीर खुपसले हे सुध्दा जनतेने ओळखले असल्याचा आरोप गुलाब भोसले यांनी केला.
रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून संगमनेर-अकोले तालुक्याला न्याय मिळेल असाच प्रयत्न केला आहे. मात्र रेल्वे मंत्र्याकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहाता अनेकांच्या रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर राजकीय पोळी भाजून घेणाऱ्याच्या भूमिका उघड्या पडल्यामुळेच मंत्री विखे पाटील आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या दिल्लीतील भेटीच्या चिंता थोरातांना अधिक सतावत असल्याची टिका भोसले यांनी केली आहे.