आश्‍वी बुद्रुक येथील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात!

संगमनेर Live
0
आश्‍वी बुद्रुक येथील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात!

◻️​ जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी १३ हजारांची मागणी; दोन खासगी व्यक्तीसह तिघांवर गुन्हा दाखल


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथील तलाठ्याला खासगी व्यक्तीच्या माध्यमातून १३ हजार रुपयांपैकी ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी तलाठ्यासह दोन खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी स्वतःचा कुणबी जातीचा दाखला आणि कास्ट व्हॅलिडिटी काढायची होती. यासाठी तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे यांनी यापूर्वीच तक्रारदाराकडून १३ हजार रुपये लाचेच्या स्वरूपात उकळले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा तक्रारदाराच्या बहिणीचा कुणबी दाखला काढण्यासाठी ६ हजार रुपये आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी ७ हजार रुपये, अशी एकूण १३ हजार रुपयांची नवीन मागणी तलाठी बोऱ्हाडे याने केली होती. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने अखेर अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.

तलाठी बोऱ्हाडे याने आपली तहसील आणि प्रांत कार्यालयात चांगली ओळख असल्याचे सांगून बहिणीचा दाखला काढून देण्याच्या मोबदल्यात लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मंगळवार दि. ​१७ फेब्रुवारी २०२६ रोजी संगमनेर शहरातील तहसील कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला होता. यावेळी बोऱ्हाडे यांच्यासाठी खासगी व्यक्ती हितेश घोडेकर याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारून ते प्रतीक कातोरे याच्याकडे सोपवले. यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने या तिघांनाही पकडून ताब्यात घेतले.

दरम्यान ​ही यशस्वी कारवाई नाशिक परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरचे पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र निमसे, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हारूण शेख यांच्या पथकाने केली आहे.

दरम्यान तलाठी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे (वय - ५७) यांच्यासह हितेश घोडेकर आणि प्रतीक कातोरे यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे या करत असून या कारवाईने भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मध्यस्थांचे धाबे मात्र, चांगलेच दणाणले आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !