संगमनेर पंचायत समितीसमोर मालदाडच्या मजुरांचे टाळ-मृदंगासह अनोखे आंदोलन

संगमनेर Live
0
संगमनेर पंचायत समितीसमोर मालदाडच्या मजुरांचे टाळ-मृदंगासह अनोखे आंदोलन

◻️ ​तीन महिन्यांचे मानधन रखडले; आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित



​संगमनेर LIVE | सरकार एकीकडे कोट्यवधींच्या जाहिराती करत असताना, दुसरीकडे मात्र हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे घामाचे पैसे गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील ‘मनरेगा’ मजुरांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पंचायत समितीवर धडक दिली. विशेष म्हणजे, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात हे आंदोलन करण्यात आल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले गेले. या आंदोलनाचे नेतृत्व मालदाडचे सरपंच गोरक्षनाथ बाबासाहेब नवले यांनी केले.

​महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांवर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठा अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पंचायत समिती संगमनेर मार्फत काढण्यात येणारे हजेरी मस्टर दिनांक २ फेब्रुवारी २०२६ पासून तांत्रिक कारणास्तव रखडल्याने मजुरांना रोजगारापासून वंचित राहावे लागत होते. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून मजुरांचे हक्काचे मानधन त्यांच्या बॅक खात्यावर जमा झाले नसल्यामुळे मजुरांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. याच संतापातून मजुरांनी ‘प्रशासनाला जाग यावी’ या उद्देशाने टाळ-मृदंग घेऊन अभंग गात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

​आंदोलनाची आक्रमकता पाहून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी तत्काळ आंदोलकांची भेट घेतली. यावेळी सरपंच गोरख नवले यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली. 

​गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी मजुरांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत, मजुरांचे मस्टर तात्काळ काढण्याचे लेखी आदेश संबंधित विभागाला दिले. तसेच प्रलंबित मानधनाबाबत जिल्हा पातळीवर पाठपुरावा करून त्वरित कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. 

दरम्यान प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले. या आंदोलनासाठी मालदाड गावातील नागरिक व मनरेगा मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !