भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी डॉ. सुजय विखे पाटील यांची निवड
◻️ रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन २०२९’ साठी भाजपची नवी टीम सज्ज!
संगमनेर LIVE (शिर्डी) | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाची बहुप्रतिक्षित नवीन प्रदेश कार्यकारणी आज जाहीर केली आहे. आगामी निवडणुकांचे राजकीय समीकरण लक्षात घेऊन या कार्यकारणीत अनुभवी चेहरे आणि तरुण रक्त यांचा अचूक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून नगर जिल्ह्याला प्रदेश पातळीवर मोठे स्थान देण्यात आले आहे.
या नवीन कार्यकारणीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबतच अतुल काळसेकर, भारती पवार, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रविण कोटे, गोपीचंद पडळकर, श्रीमती प्रिया शिंदे आणि अर्चना पाटील चाकूरकर अशा अनुभवी नेत्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटन बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रदेश सरचिटणीस पदी राजेश पांडे, श्रीमती माधवी नाईक, निरंजन डावखरे, चैतन्यबापू देशमुख, प्रवीन पोटे, संजय कौडगे, योगेश सागर, संजय कुटे, अर्चना डेहनकर आणि सुनील राणे या १० नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तसेच, प्रदेश चिटणीस म्हणून प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रविण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी वाघ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी म्हणजेच कोषाध्यक्ष पद मिहीर कोटेचा यांच्याकडे सोपवण्यात आले असून, अरुण लखानी सह कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतील. रविंद्र अनासपुरे यांची मुख्यालय प्रभारी तर विश्वास पाठक यांची मुख्यालय सह प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे.
विविध आघाड्यांच्या आणि मोर्चाच्या निवडीमध्ये नवनाथ बन यांची भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते पदी, तर कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. श्रीमती चित्रा वाघ यांच्याकडे महिला मोर्चाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
सामाजिक समीकरणे बांधण्यासाठी ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी योगेश टिळेकर, एस.सी. मोर्चासाठी विश्वजीत गायकवाड, एस.टी. मोर्चासाठी देवराव होळी, भटके विमुक्त मोर्चासाठी नरेंद्र पवार आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी इद्रीस मुलतानी यांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्या आहेत.
या नवीन निवडींमुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नवी फळी मैदानात उतरणार आहे. विशेषतः सुजय विखे पाटील, गोपीचंद पडळकर आणि चित्रा वाघ यांसारख्या आक्रमक नेत्यांना मिळालेल्या संधीमुळे आगामी काळात भाजपची रणनीती अधिक धारदार होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.