निमगावजाळी शिवारात दोन कारची धडक; तिघे जखमी
◻️ दैव बलवत्तर म्हणून एअर बॅग्स उघडल्याने मोठा अनर्थ टळला
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारात शुक्रवारी दुपारी दोन चारचाकी वाहनांच्या झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. २७) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास लोणीकडून संगमनेरच्या दिशेने जाणारी इनोव्हा क्रिस्टा (एम.एच. १७ डीसी ६५६५) कार आणि संगमनेरकडून लोणीच्या दिशेने येणारी स्विफ्ट (एम.एच. १७ सीएक्स ५९२७) कार यांच्यात निमगावजाळी शिवारातील हॉटेल न्यू तरंग नजीक जोरदार धडक झाली. त्यामुळे दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, दैव बलवत्तर म्हणून गाड्यांमधील सुरक्षिततेच्या एअर बॅग्स वेळेवर उघडल्या गेल्या, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आहे.
या अपघातात लोणी येथील हॉटेल व्यावसायिक गणपत भोसले यांच्यासह संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील श्री. रहाटळ आणि त्यांच्या समवेत असलेला एक जण असे एकूण तिघे जण जखमी झाले आहेत. भोसले यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जवळे कडलग येथील इतर दोन जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
दरम्यान अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी समयसूचकता दाखवत तातडीने अपघातस्थळी धाव घेतली आणि जखमींना मदतकार्य केले. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली आहे. तर, माहिती मिळताचं पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्याला सहकार्य केले.