आमदार अमोल खताळ यांचा विधिमंडळात प्रश्नांचा भडिमार!

संगमनेर Live
0
आमदार अमोल खताळ यांचा विधिमंडळात प्रश्नांचा भडिमार!

◻️ संगमनेरच्या प्रलंबित विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष!


​संगमनेर LIVE | संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी राज्याच्या विधिमंडळात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागातील त्रुटी आणि आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेबाबत त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्य सरकारचे लक्ष वेधले.

​अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजावर टीका करताना आमदार खताळ म्हणाले की, हा विभाग थेट गोरगरीब आणि शेतकरी वर्गाशी निगडित असतानाही सध्या अनेक अडचणींना सामोरे जात आहे. अनेक ठिकाणी अन्न योजना मर्यादित किंवा स्थगित झाल्यामुळे स्वस्त धान्य दुकाने आणि सनकिट योजनांवर विपरीत परिणाम झाला असून गरजूंचे संरक्षण कमी झाले आहे. 

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची देयके वेळेवर मिळत नसल्याने असंतोष वाढत असून, साठवणूक आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट रेशनकार्ड आणि अपात्र लाभार्थ्यांची कठोर पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रेशनकार्डमधील दुरुस्ती प्रक्रिया अत्यंत संथ असल्याने ती प्रभावी करण्याची आणि रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बंद पडलेले शिवभोजन केंद्र पुन्हा सुरू करण्याचा प्रस्तावही तातडीने मंजूर करावा, असे त्यांनी नमूद केले.

​आरोग्य सुविधांच्या बाबतीत आमदार खताळ यांनी अत्यंत संताप व्यक्त केला. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले असून, यासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी लावून धरली. घुलेवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे आणि चंदनापुरी, धांदरफळ खुर्द व तळेगाव दिघे येथील आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. 

यासोबतच संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयात मंजूर झालेल्या १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

​सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डायलिसिससाठी वापरले जाणारे रक्त एचआयव्ही (HIV) बाधित असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने रुग्णांच्या जीविताशी खेळ होत असल्याचे सांगत, आमदार खताळ यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रेशन व्यवस्थेतील सुधारणा, रखडलेल्या आरोग्य केंद्रांचे प्रस्ताव आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून, त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष आता सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !