शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई करा - आमदार अमोल खताळ
◻️ शिक्षकांवरील अन्याय आणि इंग्रजी शाळांच्या फी वसुलीबाबत सरकारचे वेधले लक्ष
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था, खाजगी शिक्षण संस्थांकडून शिक्षकांवर होणारा अन्याय आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये फी वसुलीच्या नावाखाली पालकांना दिली जाणारी अमानुष वागणूक, या गंभीर विषयांकडे आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले. तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील या समस्यांवर त्यांनी सभागृहात अत्यंत आक्रमक भूमिका मांडली.
आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. अनेक शाळांच्या इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून, अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वीच शासनाने या शाळांच्या दुरुस्तीकडे आणि पुनर्बांधणीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. केवळ पायाभूत सुविधाच नाही, तर शिक्षण संस्थांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी गंभीर ताशेरे ओढले.
मतदारसंघातील काही खाजगी शिक्षण संस्था आपल्या फायद्यासाठी शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी पाठवत असून, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षकांना अशा प्रकारे वेठीस धरणाऱ्या संस्थाचालकांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचताना आमदार खताळ यांनी सांगितले की, फी भरली नाही म्हणून पालकांना अवाजवी दंड आकारला जातो, इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना वर्गात बसू न देणे किंवा शाळेच्या बसमधून अर्ध्या रस्त्यात खाली उतरवणे यांसारख्या अमानुष धमक्या दिल्या जात आहेत. ही वागणूक केवळ बेकायदेशीरच नाही तर विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यासाठीही घातक आहे.
“शिक्षण हा अधिकार आहे, तो नफा कमवण्याचा व्यवसाय नाही," असे ठामपणे सांगत त्यांनी शासनाने याप्रकरणी हस्तक्षेप करून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.