पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला ते स्पष्ट करावे - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला ते स्पष्ट करावे - बाळासाहेब थोरात

◻️ नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत कोणतीही तडजोड न स्वीकारण्याचा इशारा


​संगमनेर LIVE | नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नावर पालकमंत्री रेल्वेमंत्री आश्‍विनी वैष्णव यांना भेटल्याचे कळाले, ही आनंदाची बाब आहे; मात्र त्यांनी तीन पैकी नेमक्या कोणत्या रेल्वे मार्गाचा नकाशा मंत्री महोदयांना दाखविला आणि ते नेमका कोणता मार्ग रेटत आहेत, हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे थेट नाव न घेता निशाणा साधला.

संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी अनेक कळीचे प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.

​ते म्हणाले, २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देण्यात आली होती आणि फेब्रुवारी २०२० मध्ये सेंट्रल रेल्वेकडून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल  मंजूर झाला होता. या आराखड्यानुसार नाशिक, सिन्नर, संगमनेर, साकूर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, हडपसर ते पुणे असा सरळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. 

या प्रक्रियेत मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्यापासून ते भूसंपादनासाठी साडेतीनशे कोटी रुपये खर्च करण्यापर्यंतची सर्व पावले माझ्या साक्षीने पडली होती. त्यावेळी सर्व तांत्रिक अडचणींचा विचार करूनच मार्ग निश्चित झाला होता, मग अचानक सरकार बदलल्यानंतरच 'जीएमआरटी'च्या तांत्रिक अडचणींचा बागुलबुवा का उभा केला जात आहे, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.

​सध्या या रेल्वेसाठी तीन मार्ग चर्चेत आहेत, ज्यामध्ये दोन मार्ग संगमनेर आणि अकोले तालुक्यातून जाणारे आहेत, तर तिसरा मार्ग शिर्डीमार्गे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर नेमकी कोणती भूमिका मांडली आणि कोणता नकाशा सुचवला, याची स्पष्टता संगमनेरच्या जनतेला मिळणे गरजेचे आहे. 

मुंबई-नाशिक-पुणे हा राज्याचा 'गोल्डन ट्रँगल' असून या भागातील व्यापार, शेती आणि उद्योगासाठी थेट रेल्वे जोडणी ही अत्यावश्यक गरज आहे. सरळ मार्गाऐवजी वाकडी वाट धरून विकास साधणे हे या भागाला परवडणारे नाही. हा विषय राजकारणाचा नसून या परिसराच्या पुढील शंभर वर्षाच्या भविष्याचा आहे. त्यामुळे संगमनेरची रेल्वे हा इथल्या जनतेच्या अस्मितेचा मुद्दा असून, मूळ मार्गाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे थोरात यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !