देवस्थान विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - आमदार अमोल खताळ
◻️ निझर्णेश्वर, रामेश्वर, खांडेश्वर, कपारेश्वर आणि बाळेश्वर येथे सपत्नीक अभिषेक आणि महापूजा
◻️ खांडगावच्या कपारेश्वर देवस्थानाला 'क' वर्ग दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन
संगमनेर LIVE | “भरपूर पाऊस पडू द्या, बळीराजा सुखी होऊ द्या. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वाना उत्तम आरोग्य लाभू द्या आणि सर्वाच्या मनोकामना पूर्ण होऊ द्या,” अशी प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील विविध महादेव देवस्थानांच्या चरणी केली. महाशिवरात्र उत्सवानिमित्त आयोजित महापूजा आणि अभिषेकानंतर बोलताना त्यांनी देवस्थानांच्या सर्वागीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा ग्वाही दिली.
आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर, रामेश्वर, खांडेश्वर, कपारेश्वर आणि बाळेश्वर या देवस्थानांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक, महापूजा आणि महाआरती करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, “मी एका धार्मिक परिवारातून आलो असून प्रत्येक देवस्थानाबद्दल माझ्या मनात नितांत श्रद्धा आहे. आतापर्यत मला मिळालेल्या विकासनिधी पैकी निम्म्याहून अधिक निधी मी जाणीवपूर्वक देवस्थानांच्या कामांसाठी खर्च केला आहे. महायुती सरकारने नेहमीच धार्मिक स्थळांच्या संवर्धनाला प्राधान्य दिले असून, जनतेनेही या कार्यासाठी सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे.” असे आवाहन केले.
आमदार खताळ यांनी यावेळी हिंदू धर्माच्या जतनावर विशेष भर दिला. “धर्म टिकला तरच देश टिकेल. आपल्या संस्कृतीचे आणि धर्माचे जतन करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले आणि तरुण पिढीला आपल्या देव-धर्माची योग्य माहिती देऊन त्यांच्यात जनजागृती करणे काळाची गरज आहे,” असे आवाहन केले.
खांडगाव येथील कपारेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आमदार खताळ यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांनी सांगितले की, “कपारेश्वर देवस्थानाला सर्वप्रथम 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव त्वरित तयार करून माझ्याकडे द्यावा. हा प्रस्ताव जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर ठेवून, त्यांच्या माध्यमातून या देवस्थानाला 'क' वर्ग दर्जा मिळवून दिला जाईल. यामुळे मंदिर परिसराच्या मोठ्या प्रमाणावरील विकासाचा मार्ग मोकळा होईल.” अशी ग्वाही दिली.
दरम्यान यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी तसेच विविध ठिकाणचे देवस्थान विश्वस्त, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.