सात्रळमध्ये महाशिवरात्रीनिमित्त ‘रुद्र शांती यज्ञा’द्वारे मानवी विकारांचे दहन!

संगमनेर Live
0
सात्रळमध्ये महाशिवरात्रीनिमित्त ‘रुद्र शांती यज्ञा’द्वारे मानवी विकारांचे दहन!

◻️ ​ब्रह्मा कुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयात शिव ध्वजारोहण आणि आध्यात्मिक प्रवचनांचे आयोजन


संगमनेर LIVE (​सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या वतीने विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. ‘स्व-कल्याण आणि विश्व-कल्याण’ हा संकल्प केंद्रस्थानी ठेवून पार पडलेल्या या सोहळ्याने पंचक्रोशीतील वातावरण भक्तिमय झाले होते.

​या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात परमात्मा शिवाच्या ध्वजारोहणाने झाली, यावेळी उपस्थित भाविकांनी शिव ध्वजाखाली उभे राहून स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रतिज्ञा केली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रुद्र शांती यज्ञात मानवी जीवनातील दुःख आणि त्रासाला कारणीभूत ठरणारे विकार, दुर्गुण आणि वैयक्तिक कमजोरी यांचे दहन करण्यात आले. यावेळी प्रत्येकाने आपल्यातील उणिवा सोडण्याचा दृढ संकल्प करून आध्यात्मिक शुद्धी केली आणि विशेष ध्यानधारणेच्या माध्यमातून ईश्‍वरीय शांती व शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

​आध्यात्मिक मार्गदर्शन करताना सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी पद्मावती दीदी यांनी महाशिवरात्रीचे रहस्य उलगडून सांगितले. त्या म्हणाल्या की, महाशिवरात्री म्हणजे केवळ उपवास नसून आपल्यातील अज्ञान आणि विकारांचा त्याग करून परमात्म्याशी नाते जोडण्याचा दिवस आहे. त्यांनी उपस्थितांना ध्यानधारणेद्वारे मनाच्या शांतीची अनुभूती दिली. तसेच, ब्रह्माकुमारी निकिता बहीण आणि ब्रह्माकुमारी अर्चना बहीण यांनी ईश्‍वरीय ज्ञान, परमात्म्याचा खरा परिचय आणि आध्यात्मिक प्राप्ती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

​महाशिवरात्रीचे औचित्य साधून तपोवन, सात्रळ-सोनगाव येथे ‘शिव महात्म्य’ विषयावर ५ दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी हे प्रवचन पार पडणार असून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या उत्सव सोहळ्याला ज्येष्ठ नेते बाळकृष्ण चोरमुंगे, मंगलताई चोरमुंगे, मनीषाताई जोर्वेकर, राधाताई जोर्वेकर, डॉ. सुनील जोर्वेकर, प्रकाश वालझाडे, राजू बोऱ्हाडे, अनिता वालझाडे, वैशाली वालझाडे, निर्मला सजन, नामदेव डुकरे, मेघना डुकरे, शिक्षक डहाळे, शिक्षक सुभाष शेजवळ, रंगनाथ पांडे, हिरानंदानी, उषाताई कडू, संगीता सोनवणे, श्रीमती आनेराव यांच्यासह कोल्हार सेवाकेंद्राचे राजयोगी शिवाजी भाईजी, स्वाती दीदी, सविता बहेनजी, संजय शिंग्वी, मोतीलाल मुंदडा, चांगदेव शिंदे, भगवान वालझाडे, श्‍वेता सोनवणे, श्रीमती लोढा आणि सात्रळ परिसरातील ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान या कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वाटप करुन झाली. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !