साईबाबांची सेवा हे आमचे परमभाग्य; डॉ. विखे पाटील यांनी ओढला भक्तिचा रथ
◻️ शिर्डीत १ लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत ‘साई परिक्रमा’ सोहळा संपन्न!
संगमनेर LIVE (शिर्डी) | ‘ओम साई राम’च्या अखंड जयघोषात आणि भक्तीच्या सागरात न्हाऊन निघालेल्या शिर्डी नगरीत यंदाचा ‘साई परिक्रमा महोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. देश-विदेशातून आलेल्या सुमारे १ लाखांहून अधिक भाविकांनी १४ किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करत साईचरणी आपली श्रद्धा अर्पण केली. या सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
या परिक्रमेची सुरुवात पहाटे साडेचार वाजता खंडोबा मंदिर परिसरातून झाली. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात साईनामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी नगरी दुमदुमून गेली होती. या १४ किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्यामुळे भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे या परिक्रमेत महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. तसेच विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संत-महंत आणि विविध राज्यांतून आलेल्या साईभक्तांमुळे या परिक्रमेला खऱ्या अर्थाने व्यापक आणि वैश्विक स्वरूप प्राप्त झाले होते.
या सोहळ्याचे औचित्य साधून डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः साईबाबांचा रथ ओढत ‘साईबाबा की जय’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले की, साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे परमभाग्य आहे. साईबाबांचे प्रेम केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते जगभर पसरले आहे, याची प्रचिती आजच्या या अथांग जनसागरावरून येत आहे. शिर्डीच्या पावन भूमीत श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा हा अद्वितीय संगम पाहणे हा एक सुखद अनुभव असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
लाखो भाविकांची उपस्थिती असूनही प्रशासनाने आणि स्वयंसेवकांनी अत्यंत चोख नियोजन केले होते. भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच परिक्रमा मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, फराळ आणि महाप्रसादाची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. भावनिक आणि भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या साई परिक्रमेत सहभागी होऊन लाखो भाविकांनी साईचरणी नतमस्तक होत आपल्या अढळ श्रद्धेची प्रचिती दिली.
दरम्यान श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारा हा सोहळा शिर्डीच्या इतिहासात पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे.